INDvsWI: पराभवानंतर शुबमन गिलचा मोठा खुलासा; म्हणाला, “या दोन गोष्टींमुळे सामना हातातून गेला”
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना 3 ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 351 धावा केल्या. मात्र, वेस्ट इंडिजने 5 गडी राखून हे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आणि सामना जिंकला. भारतासाठी केएल राहुलने शानदार शतक झळकावले, परंतु त्याच्या या खेळीमुळे संघाला विजय मिळवून देता आला नाही.
पराभवानंतर, भारतीय कर्णधार शुबमन गिलने संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. तो म्हणाला, “आमच्यासाठी अनेक गोष्टी चांगल्या घडल्या. आमच्या संघाला काही आघाड्यांवर सुधारणा करण्याची गरज आहे. संघाच्या एकूण धावसंख्येबाबत मी खूप समाधानी होतो. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार याची आम्हाला कल्पना होती. मला कुलदीपची काही षटके शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची होती. आमचे क्षेत्ररक्षण अधिक चांगले असू शकले असते. तसेच, ‘डेथ ओव्हर्स’मध्ये (अंतिम षटकांमध्ये) गोलंदाजी सुधारण्याचीही गरज आहे.” गिलच्या या विधानांवरून हे स्पष्ट झाले की, तो भारतीय संघाच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबाबत समाधानी नव्हता.
भारतासाठी रोहित शर्माने 82 चेंडूंत 92 धावांची उत्कृष्ट खेळी केली, ज्यामध्ये त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऋतुराज गायकवाडनेही अर्धशतक झळकावले तो 57 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुलने आक्रमक फलंदाजी करत 87 चेंडूंत 129 धावा केल्या; त्याने या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यादरम्यान राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पाही गाठला. नमन धीरने 21 चेंडूंत 30 धावा केल्या.
352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला शानदार सुरुवात मिळाली. सलामीवीर आणि कर्णधार शाई होप याने शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 143 चेंडूंत नाबाद 162 धावांची खेळी केली, ज्यात 17 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अमीर जंगूनेही अर्धशतक (67 धावा) केले, तर कीमो पॉलने 35 चेंडूंत 44 धावांचे योगदान दिले. अखेरीस, वेस्ट इंडिजने 48.2 षटकांत विजयाचे लक्ष्य गाठत भारताचा 5 गडी राखून पराभव केला. मोठी धावसंख्या उभारूनही, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांचा फटका भारताला बसला. सामन्यानंतर, शुबमन गिलने या दोन्ही आघाड्यांवर सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले.
Comments are closed.