महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रवासाला; दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार
मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिली आहे. मुंबईतून मान्सून साधारणपणे 8 ऑक्टोबरला परततो. यंदा मात्र मान्सून पाच दिवस आधीच मुंबईतून परतला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील काही भागांतही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनची माघार सुरू झाली असली तरी काही ठिकाणी परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासांत देशातील 13 राज्यांच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
मुंबईकरांना ऑक्टोबर हीटचा तडाखा
एकीकडे पाऊस माघार घेण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे वाढत्या तापमानाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच उकाडय़ाने मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारी कुलाबा येथे 36.5 आणि सांताक्रुझ येथे 37.4 कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील दिवसाचे तापमान 35 ते 37 अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
यंदा देशभरात 12.6 टक्के कमी पाऊस
जून ते सप्टेंबरदरम्यान देशात पावसाची 12.6 टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या 87.4 टक्के पाऊस झाला.
Comments are closed.