'इंडिया' युती पुन्हा एकत्र
केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पाच मुद्यांवर सहमती : बैठकीत 25 पक्षांचा सहभाग
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची पहिली औपचारिक बैठक सोमवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीत 25 राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. दोन तासांहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत विविध राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केल्यानंतर पाच महत्त्वाच्या ठरावांवर सर्व प्रतिनिधींनी एकमत दर्शवल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेस आणि टीएमसीसह अनेक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व नेत्यांचे स्वागत केले आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 17 एप्रिल रोजी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचनेवरील द्वेषपूर्ण विधेयकांचा पराभव करताना आम्ही आमची एकता आणि एकजूट अत्यंत निर्णायकपणे दाखवून दिल्याबद्दल खर्गे यांनी सर्व सहभागी पक्षप्रतिनिधींचे कौतुक केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वर इंडिया ब्लॉकच्या बैठकीचा व्हिडिओ, तसेच बैठकीतील त्यांच्या भाषणाची प्रत शेअर केली.
दोन वर्षांनंतर सोमवारी झालेल्या इंडिया ब्लॉकच्या 7 व्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन दिल्लीतील बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले, तर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, कपिल सिब्बल आणि इतरही उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली. ‘नीट’मध्ये देशातील तरुणांची फसवणूक झाली आहे. नीट आणि सीबीएसईमधील अनियमिततेसाठी शिक्षणमंत्री जबाबदार आहेत; त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे खर्गे म्हणाले. महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी आघाडी दर दोन महिन्यांनी बैठक घेईल. इंडिया ब्लॉक एसआयआर आणि निवडणुकांच्या निष्पक्षतेबाबत सरन्यायाधीशांना पत्रही लिहिणार आहे. पुढील बैठक 8 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षही सकाळच्या सत्रात बैठका घेणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.
दर दोन महिन्यांनी बैठकीचे नियोजन
आघाडी सक्रिय ठेवण्यासाठी, इंडिया अलायन्समधील सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी नियमित बैठका घेतील, असे ठरवण्यात आले. याव्यतिरिक्त, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांची रणनीती मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात दररोज सकाळी एक समन्वय बैठक आयोजित केली जाईल.
उद्धव ठाकरे व्हर्च्युअली सहभागी
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन या नेत्यांनी बैठकीत व्हर्च्युअली सहभागी होत आपली मते व्यक्त केल्याचे सांगितले. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिला. तसेच राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे मूर्ख आहेत. राहुल गांधी हे देशातील सर्वात महत्त्वाच्या, लोकप्रिय आणि उत्साही नेत्यांपैकी एक आहेत. सरकार त्यांना घाबरते. देशाशी गद्दारी करणाऱ्यांना सत्तेतून हटवणे हाच आमचा एकमेव अजेंडा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
आघाडी एकसंध ठेवणे आवश्यक : शरद पवार
इंडिया आघाडीची शेवटची बैठक 1 जून 2024 रोजी दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. याचा अर्थ आघाडीचे नेते दोन वर्षांनंतर एकत्र जमले होते. बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आघाडीच्या सर्व पक्षांना एकत्र ठेवणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत नोंदवले. एका बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक पक्षांची एकजूट आहे. आता सर्व पक्ष एकत्र आले आहेत. आघाडीतील मतभेद मिटवण्यासाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल. मला खात्री आहे की तोडगा निघेल. पुढील 2-3 वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्यामुळे सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आणि आघाडी मजबूत करण्यासाठी ही वेळ महत्त्वाची आहे, असेही पवार म्हणाले.
Comments are closed.