हॉकीच्या मैदानातही हिंदुस्थानचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक; गोलांचा ‘पंच’ मारत टीम इंडिया बाद फेरीत
हॉकीचे मैदान… समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि वर्ल्ड कपचे भवितव्य पणाला. अत्यंत तापलेल्या वातावरणात हिंदुस्थानने हॉकीच्या मैदानात पाकिस्तानवर ५-३ असा सर्जिकल स्ट्राइक केला आणि हॉकी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला. हरमनप्रीत सिंह आणि अभिषेक यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या आतषबाजीने पाकिस्तानचा बचाव अक्षरशः सळो की पळो करून सोडला.
पहिल्याच क्वार्टरमध्ये वर्चस्व
सामन्याच्या पाचव्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने दुसऱ्या संधीचे सोने करत हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर ११ व्या मिनिटाला अभिषेकच्या अप्रतिम कौशल्यातून निर्माण झालेल्या संधीवर मनदीपने डिफ्लेक्शन करत हिंदुस्थानची आघाडी २-० केली.
पहिल्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. आक्रमक चढ़ाया, सर्कलमधील वारंवार प्रवेश आणि पेनल्टी कॉर्नरच्या संधींनी पाकिस्तानच्या बचावाची चांगलीच परीक्षा घेतली.
पाकिस्तानचा प्रतिहल्ला
दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीतने पुन्हा गोल करत हिंदुस्थानची आघाडी ३-० केली; मात्र पाकिस्तानने हार मानली नाही. हन्नान शाहिदने गोल करत खाते उघडले आणि त्यानंतर सुफियान खानने आणखी एक गोल करत सामना ३-२ असा रंगतदार केला. पण पाकिस्तानच्या पुनरागमनाला हिंदुस्थानने लगेच लगाम घातला. अभिषेकने पुन्हा गोल करत हिंदुस्थानची आघाडी ४-२ ने वाढवली. दोन गोल करणारा अभिषेक सामन्यातील आक्रमणाचा प्रमुख चेहरा ठरला.
हार्दिकचा पेनल्टी स्ट्रोक; पाकिस्तानला धक्का
तिसऱ्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानने आक्रमणाची धार कायम ठेवली. ३५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हार्दिकने गोल करत स्कोअर ५-२ असा केला. त्यामुळे पाकिस्तानवर आता दडपण प्रचंड वाढले होते. त्याने पाकिस्तानची शेवटची धडपड सुरू झाली. मात्र हिंदुस्थानने आपला बचाव अभेद्य राखत पाकिस्तानला मान वर काढू दिली नाही.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच हन्नान शाहिदने आणखी एक गोल करत पाकिस्तानच्या आशा जिवंत केल्या. मात्र त्यानंतर हिंदुस्थानी बचावफळीने कोणतीही चूक केली नाही. गोलरक्षक आणि बचावपटूंनी पाकिस्तानच्या प्रत्येक चढाईला भक्कम प्रत्युत्तर दिले. अखेर ५-३ असा विजय मिळवत हिंदुस्थानने पूल डीमधील आपली मोहीम शानदार पद्धतीने संपवली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर विजय अनिवार्य असलेल्या सामन्यात हिंदुस्थानने दबाव झुगारून पाकिस्तानला नमवले.
Comments are closed.