कोकणात पावस् इलो! दोडामार्ग, कणकवलीत मुसळधार दोन दिवसांत मुंबईत धडकणार
प्रतीक्षा लागून राहिलेला मान्सून आज अखेर कोकणात डेरेदाखल झाला असून दोडामार्ग, कणकवली, देवगडसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण असून येत्या दोन दिवसांत मुंबईतही मान्सूनच्या सरी कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून राज्यातील बळीराजाही सुखावणार आहे.
4 जून रोजी केरळम किनारपट्टीवर दाखल झालेल्या मान्सूनने वेगाने अवघ्या तीन दिवसांत कर्नाटक, तामीळनाडू, गोवा आणि अरबी समुद्रातील काही भाग व्यापत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत मजल मारली आहे. तळकोकणात मान्सूनने एण्ट्री केली आहे. मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागांतही वेगाने वाटचाल करेल असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली, दोडामार्ग या भागांसह अनेक ठिकाणी शनिवारी पावसाची रिपरिप सुरू झाली असून, आंबोली आणि शिरशिंगे परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसला. उकाडय़ाने हैराण झालेल्या सिंधुदुर्गवासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
असा राहणार मान्सूनचा प्रवास
पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मान्सूनची मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग, तेलंगणाचे काही भाग, तामीळनाडू व नैऋत्य बंगालच्या उपसागराचे उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य व उत्तर भाग आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट
तळकोकणात मान्सून दाखल झाला असला तरी विदर्भात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवेत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम या जिह्यांना 8 जून रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ाला मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Comments are closed.