वयाच्या 18 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, सैन्यात भर्ती होण्याआधी टॅक्सी चालवली; आता Asian Games मध्ये जिंकले मेडल! सलमान खान…

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये गुरूवारी (24 सप्टेंबर) भारताच्या पदकसंख्येत आणखी काही पदकांची भर पडली. यामध्ये सर्वात विशेष रोइंगचे पदक ठरले, जे सतनाम सिंग आणि सलमान खानी यांनी पुरुषांच्या डबल स्कल्समध्ये जिंकले. दोघांनी ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.

भारतीय रोअर जोडीने नागरागवा आंतरराष्ट्रीय कोर्सवर 6:13:25 अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान काबीज केले. ते 1500 मीटरपर्यंत दुसऱ्या स्थानावर होते, मात्र शेवटच्या 500 मीटरमध्ये ते तिसऱ्या स्थानावर गेले.

या खेळामध्ये सुवर्ण पदक चीनच्या यी झुदी आणि नी यिदे यांनी पटकावले. त्यांनी 6:09:77 अशा वेळेची नोंद केली, तर उझबेकिस्तानच्या मेखरोजबेक ममातकुलोव आणि पावेल सोरिन यांनी 6:10:49 वेळेची नोंद करत रौप्य पदक मिळवले.

पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारामध्ये भारताचे हे पहिलेच आशियाई क्रीडा स्पर्धेचे पदक ठरले. तसेच सतनामसाठी हे सलग दुसरे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक ठरले आहे. तो हांगझू 2023 मध्ये तिसरे स्थान मिळवणाऱ्या भारतीय पुरुष क्वाड्रपल स्कल्स संघाचा भाग होता. दुसरीकडे सलमानचे हे पहिलेच आशियाई क्रीडा स्पर्धेचे पदक ठरले आहे.

सलमानच्या या पदकामागे अथक परिश्रम आहेत. उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील पुरे धिंगाई येथे जन्मलेल्या सलमानने त्याचे शालेय शिक्षण हरियाणामध्ये पूर्ण केले. तो चार भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सर्वात मोठा आहे. तो अवघ्या 18 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे डेंग्यूने निधन झाले.

सलमानचे लहान बहिण-भाऊ शिकत असल्याने त्याच्यावर कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी आली. त्यामुळे त्याचे सैन्यात जाण्याचे स्वप्न थोडे मागे राहिले. त्याने रात्रंदिवस मेहनत केली. उबर कॅब चालवत कुटुंबाला मदत केली. त्याने त्याचे सैन्यात जाण्याचे स्वप्नही पूर्ण केले. तिथेच त्याला एका मित्राने त्याची उंची आणि शरीरयष्टी सैन्यात त्याला कशी मदत करू शकते, हे सांगितले.

सलमानने कॅब दुसऱ्या ड्रायव्हरला देत चार महिने कठोर सराव केला. परिक्षा दिल्या आणि त्यामध्ये पास झाला. त्याने 2018 मध्ये पुण्याच्या खडकी येथे बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये सामील झाला.

ड्रायव्हर सलमान रोअर कसा बनला?
प्रशिक्षकांनी सलमानची उंची आणि फिटनेस पाहून त्याला रोइंगची ओळख करून दिली. तोपर्यंत त्याला या खेळाबद्दल काहीच माहित नव्हते. तसेच त्याने सुरूवातीला नकारही दिला होता, मात्र प्रशिक्षकांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. शेवटी त्याने प्रयत्न केले आणि सरावाला सूरूवात केली.

सलमानची स्पर्धात्मक सुरूवातच जबरदस्त झाली. त्याने आंतर केंद्र रेगाटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. 2021 मध्ये त्याने अर्गोमीटरचे नीकष पूर्ण केले, ज्यामुळे त्याची आर्मी रोइंग नोडसाठी निवड झाली. भारतातील सर्वोत्त्कृष्ट रोअर्ससोबत प्रशिक्षण घेतल्याने त्याच्यात मोठे आणि चांगले बदल झाले. त्याला दृष्टीकोन बदलला.

सलमानचा प्रवास… राष्ट्रीय सुवर्णपदक ते आंतरराष्ट्रीय पराक्रम
सलमानने 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सिंगल स्कल्समध्येही सुवर्ण पदकाची कामगिरी केली. यामुळे त्याची भारतीय संघात वर्णी लागली.

सलमानने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय यश 2024 मध्ये मिळवले. त्याने नितीन देओलसोबत आशियाई रोइंग कपमध्ये सुवर्णपदक जिंकले. याचा परिणाम उत्तम झाला आणि तो सैन्यात नायब सुभेदार बनला.

सलमानने सातत्य राखले आणि एकामागोमाग पदकविजेती कामगिरी केली. त्याने 2025 च्या ऑस्ट्रेलियन रोइंग चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक आणि 2025 च्या आशियाई रोइंग चॅम्पियनशीपमध्ये पुन्हा रौप्य पदक जिंकले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.

भारताचे रोइंगचे 29 वे पदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमधील हे भारताचे 29 वे पदक होते. हांगझूमध्ये देशाने यापेक्षा अधिक पदके जिंकली होती, ज्यात दोन रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण पाच पदके होती. यामुळे तेव्हा ग्वांगझू 2010 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेतील रोइंगमधील आपल्या सर्वोत्तम पदकसंख्येची बरोबरी केली होती.

भारताने ऐची-नागोया 2026 मधील आठ रोइंग स्पर्धांसाठी 17 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश असलेला 22 सदस्यीय संघ मैदानात उतरवला. (India Satnam Singh and Salman Khan in Men’s Double Sculls Bronze medal Asian Games 2026, at 18 Salman lost his father )

Comments are closed.