अंध क्रिकेटमध्येही आता रंगणार हिंदुस्थान-पाकिस्तान महामुकाबला; बांगलादेशचा धुव्वा उडवत गाठली अंतिम फेरी
पाकिस्तानकडून अखेरच्या चेंडूवर निसटता पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हिंदुस्थान अंध क्रिकेट संघाने जबरदस्त पुनरागमन करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यजमान बांगलादेशला आठ विकेट्सनी धूळ चारत हिंदुस्थानने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. आता 20 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. साखळी सामन्यात एका विकेटने झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी हिंदुस्थानी संघाला मिळाली आहे
बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हिंदुस्थानी गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी अचूक मारा करत बांगलादेशला 20 षटकांत सात बाद 123 धावांवर रोखले. कर्णधार टी. दुर्गारावने तीन षटकांत अवघ्या दहा धावा देत एक विकेट मिळवली. लोकेश, देबराज बेहेरा आणि सुनील रमेश यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला. हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांनी तब्बल तीन फलंदाजांना धावचीत करत यजमानांचे पंबरडे मोडले.
विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने अवघ्या 13.2 षटकांत दोन विकेट्स गमावत पार केले. सुनील रमेशने 41 चेंडूंत सात चौकारांसह नाबाद 63 धावांची झंझावाती खेळी केली. संजय कुमार शाहने 25 चेंडूंत 32 धावांची मोलाची साथ दिली, तर सुखरामने नाबाद 20 धावा केल्या.
Comments are closed.