सॅफ फुटबॉलमध्ये हिंदुस्थानची जेतेपदाची हॅटट्रिक, पाकिस्तानला लोळवून दहाव्यांदा मारली बाजी; अखेरच्या 2 मिनिटांत सँडीपचा विजयी हेडर
क्रिकेट, हॉकी नव्हे तर फुटबॉलमध्येही हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानी संघाला चिरडले. सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात पिछाडीवर असूनही हिंदुस्थानी फुटबॉलपटूंनी जिद्द सोडली नाही. शेवटची शिट्टी वाजेपर्यंत हार मानायची नाही, हेच जणू ब्रीदवाक्य घेऊन मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानी युवा शिलेदारांनी पाकिस्तानचे विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानवर 2-1 असा सनसनाटी विजय मिळवत विक्रमी दहाव्यांदा विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे हिंदुस्थानने सलग तिसऱयांदा या स्पर्धेचा मुकुट जिंकत विजेतेपदाची हॅटट्रिकही साकारली.
ढाका येथील राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या अंतिम लढतीत पाकिस्तानने 45 व्या मिनिटानंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत अलमगीर गाझीने अप्रतिम फटका मारत पाकिस्तानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानसमोर आता पिछाडी भरून काढण्याचे मोठे आव्हान होते.
मात्र दुसऱ्या सत्रात सामन्याचे चित्रच पालटले. 59 व्या मिनिटाला जुनेद शाह याला ब्रायसन फर्नांडिसविरुद्धच्या धोकादायक टॅकलसाठी व्हीएआरच्या पाहणीनंतर थेट लाल कार्ड दाखवण्यात आले. पाकिस्तानला दहा खेळाडूंवर खेळावे लागले आणि हिंदुस्थानने या संधीचे सोने केले. अवघ्या एका मिनिटात सुहेल अहमद भटने गोल नोंदवत हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
त्यानंतर हिंदुस्थानने आक्रमणाची धार अधिक तीव्र केली. सामना अतिरिक्त वेळेकडे झुकत असतानाच 88 व्या मिनिटाला अब्दुल रबीच्या कॉर्नरवर सँडीप मांडीने अप्रतिम हेडर लगावत चेंडू जाळय़ात धाडला. या गोलने हिंदुस्थानी विजयावर शिक्कामोर्तब केले.
Comments are closed.