साईराज ठरला मुंबईचा तारणहार; गोव्यावर अखेरच्या षटकात दमदार विजय, सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली विजयी हॅटट्रिक
साईराज पाटील हा मुंबईच्या संघासाठी तारणहार ठरला. अखेरच्या षटकात तीन विकेट्स घेत साईराजने मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गोव्याचा संघ 189 धावांत आटोपला आणि मुंबईने 18 धावांनी दमदार विजय साकारला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईने यावेळी विजयाची हॅटट्रिक साधली आहे.
तुषार देशपांडेच्या 19 व्या षटकात 19 धावा गेल्या होत्या. अर्धशतकवीर ललित यादव भन्नाट फॉर्मात दिसत होता. अखेरच्या षटकात गोव्याला विजयासाठी 22 धावांची गरज होती. दुसरीकडे मुंबईला सामना जिंकण्यासाठी तीन विकेट मिळवणे गरजेचे होते. साईराजने पहिल्याच चेंडूवर ललित यादवला बाद केले आणि मुंबईसाठी विजयाचे दार उघडले. साईराज फक्त एवढय़ावर थांबला नाही तर त्याने दुसऱयाच चेंडूवर शुभम तारीला बाद करत मुंबईला विजयाच्या उंबरठय़ावर उभे केले होते. साईराजने सहाव्या चेंडूवर गोव्याच्या अखेरच्या फलंदाजाला बाद केले आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साईराजने फक्त या विकेट्स मिळवल्या नाहीत तर संघाला धावांची गरज असताना फक्त 21 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 40 धावाही केल्या, त्यामुळे साईराज हा खऱया अर्थाने मुंबईसाठी
‘मॅचविनर’ ठरला.
तत्पूर्वी, मुंबईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी संघाची एकही धाव झालेली नसताना बाद झाला. हार्दिक तामोरेही 15 धावा करू शकला आणि त्यामुळेच मुंबईची 2 बाद 27 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर मुशीर खान आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमली. मुशीरने 40 धावा केल्या, तर सूर्याला 25 धावांवर समाधान मानावे लागले. अखेरच्या षटकांमध्ये साईराज मुंबईच्या मदतीला धावला.
विदर्भाचा हैदराबादवर अखेरच्या षटकात विजय
विदर्भाने अखेरच्या षटकात तीन विकेट्स राखत हैदराबादवर दमदार विजय साकारला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 195 धावा केल्या होत्या. विदर्भाच्या अथर्व तायडेने 82 धावांची खेळी साकारत संघाचा विजय सुकर केला.
अखेरच्या चेंडूवर महाराष्ट्र जिंकला
अखेरच्या चेंडूवर विकी ओस्तवालने चौकार लगावत महाराष्ट्राला थरारक विजय मिळवून दिला. हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 145 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राला अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज होती, त्यावेळी ओस्तवालने चौकार लगावला आणि महाराष्ट्राला दोन विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
Comments are closed.