बुमराहने रचला इतिहास! भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोठी झेप

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला; भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला. बातमी आखेरीस, न्यूझीलंडने 5 बळी गमावले असून, त्यापैकी 3 बळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मिळवले आहेत.

बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला बाद करून भारताला शानदार सुरुवात करून दिली. दुपारच्या जेवणापूर्वी त्याने डॅरिल मिचेलला तंबूत धाडले, तर जेवणानंतर टॉम ब्लंडेलला बाद करत त्याने आपला तिसरा बळी घेतला. या तीन बळींसह, बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे; त्याने भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना मागे टाकत, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या पहिल्या 10 जणांच्या (TOP-10) यादीत प्रवेश केला आहे.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 53 कसोटी सामन्यांत 237 बळी घेतले आहेत (न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना त्याचा 53वा कसोटी सामना आहे). या कामगिरीसह तो जवागल श्रीनाथ यांच्या पुढे गेला आहे, ज्यांनी भारतासाठी 67 कसोटी सामन्यांत 236 बळी घेतले होते. विशेष म्हणजे, बुमराहने श्रीनाथ यांच्या तुलनेत 14 सामने कमी खेळून हा आकडा गाठला आहे.

या यादीत बुमराहच्या पुढे, नवव्या क्रमांकावर माजी फिरकीपटू भागवत चंद्रशेखर आहेत, ज्यांच्या नावावर 242 कसोटी बळी आहेत. जर बुमराहने आपला सध्याचा फॉर्म कायम ठेवला, तर त्याला याच सामन्यात चंद्रशेखर यांना मागे टाकण्याची संधी आहे. तसेच, आठव्या क्रमांकावर असलेल्या बिशन सिंग बेदी यांना मागे टाकण्यासाठी त्याला आणखी 29 बळींची आवश्यकता आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. त्यांनी 132 कसोटी सामन्यांत 619 बळी घेतले आहेत. या यादीत 537 बळींसह आर. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

वेगवान गोलंदाजांमध्ये, भारतासाठी सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत कपिल देव अव्वल स्थानी आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी 131 सामन्यांत 434 बळी घेतले होते.

Comments are closed.