जपानचा धुव्वा उडवत हिंदुस्थान उपांत्य फेरीत
यजमान हिंदुस्थानने महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत जपानचा 4-0 गोलफरकाने धुव्वा उडवत अपराजित राहून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिलांनी स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळविला, हे विशेष.
सामन्याच्या सुरुवातीला जपानने हिंदुस्थानी आक्रमणाला कडवी झुंज दिली, मात्र हिंदुस्थानी खेळाडूंनी संयम राखत गोलची संधी साधली. लालरेम्सियामीने 12 व्या मिनिटाला हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर 16व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाने अचूक फटका मारत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी केली. नेहाने तिसरा गोल नोंदवत जपानच्या अडचणीत भर घातली. त्यानंतर दीपिकाने आणखी एक गोल करत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दीपिकाने दोन गोल नोंदवत विजयात मोलाचा वाटा उचलला.
तिसऱया सत्रात हिंदुस्थानला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले; मात्र जपानच्या बचावफळीने हे प्रयत्न रोखले. तरीही हिंदुस्थानी संघाने आपली आघाडी कायम राखली. अखेर 4-0 अशा दणदणीत विजयासह हिंदुस्थानने स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली. हिंदुस्थानचा सलग पाचवा विजय आणि उपांत्य फेरीतील प्रवेश यामुळे विजेतेपदाच्या दिशेने हिंदुस्थानी महिलांनी आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे.
Comments are closed.