संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT… सूर्यांश शेडगेचं पदार्पण? इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20साठ

भारत VS इंग्लंड 5वी T20 प्लेइंग इलेव्हन : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासाठी गेले काही दिवस अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडिया 0-3 ने पिछाडीवर असून आता अखेरचा सामना शनिवारी (11 जुलै) साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यानंतर इंग्लंडने सलग तीन सामने जिंकत भारताला बॅकफूटवर ढकलले. मालिका आधीच गमावली असली तरी भारतासाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासमोर 0-4 अशा नामुष्कीजनक क्लीन स्वीपपासून बचाव करण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

तिलक वर्माचा पत्ता कटणार? संजू सॅमसनला संधी

या मालिकेत उपकर्णधार तिलक वर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. सातत्याने कमी धावा झाल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात त्याला विश्रांती देत संघाबाहेर बसवले जाऊ शकते. त्याच्या जागी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. संजूच्या पुनरागमनाची मागणी क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांकडून सातत्याने होत होती. मधल्या फळीत अनुभव आणि आक्रमकता आणण्यासाठी संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवू शकते.

वॉशिंग्टन सुंदर OUT, सूर्यांश शेडगेला पदार्पणाची संधी?

मागील सामन्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची कामगिरी निराशाजनक ठरली. गोलंदाजीत त्याने एका षटकात 19 धावा दिल्या, तर फलंदाजीत अवघ्या 5 धावा करून तो बाद झाला. त्यामुळे अखेरच्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू सूर्यांश शेडगेला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. शेडगे फलंदाजीबरोबरच मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो, त्यामुळे संघाला अधिक संतुलन मिळण्याची शक्यता आहे.

वैभव सूर्यवंशीवर कायम विश्वास

या मालिकेत भारताला एक मोठा सकारात्मक पैलू मिळाला, तो म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी. ओल्ड ट्रॅफर्ड येथे टी-20 पदार्पण करताना त्याने भारताचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रम केला. पहिल्या तीन सामन्यांत त्याच्या नावावर केवळ 42 धावा असल्या तरी त्याने दाखवलेली निर्भीड फलंदाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः जोफ्रा आर्चरसारख्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध मारलेला षटकार सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे संघ व्यवस्थापन या युवा सलामीवीरावर विश्वास कायम ठेवण्याच्या तयारीत असून अखेरच्या सामन्यातही तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

भारताची संभाव्य Playing XI – अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, सूर्यांश शेडगे, प्रसिध्द कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा –

England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली

Comments are closed.