कुलदीप यादवच्या फिरकीत वेस्ट इंडिज नेस्तनाबूत; फॉलोऑनसुद्धा वाचवू शकले नाहीत, टीम इंडियाकडून को


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज 2 रा चाचणी: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात केवळ 248 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 518 धावा केल्या होत्या, त्यामुळे टीम इंडियाला 270 धावांची भक्कम आघाडी मिळाली. वेस्टइंडीजला फॉलोऑन सुद्धा वाचवता आला नाही आणि त्यांना पुन्हा फलंदाजीला उतरावे लागले. या संपूर्ण डावात कुलदीप यादवचा कहर पाहायला मिळाला, त्याने एकहाती पाच विकेट्स घेतल्या.

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा डाव आणि 140 धावांनी पराभव केला होता. आता दिल्लीतही वेस्ट इंडिजचा असाच एक मोठा पराभव होऊ शकतो. या सामन्याबद्दल बोलताना, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जैस्वालने 175 आणि कर्णधार शुभमन गिलने 129 धावा केल्या. याशिवाय साई सुदर्शनने 87, ध्रुव जुरेलने 44 आणि नितीश कुमार रेड्डी यांनी 43 धावा केल्या. केएल राहुलनेही 38 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने तीन आणि कर्णधार रोस्टन चेसने एक बळी घेतला. भारतीय फलंदाजांसमोर वेस्ट इंडिजचे गोलंदाज असहाय्य दिसत होते.

कुलदीप यादवच्या फिरकीत वेस्ट इंडिज नेस्तनाबूत

तिसऱ्या दिवशी वेस्टइंडीजने 4 बाद 140 अशा स्थितीतून पुढे खेळायला सुरुवात केली, पण कुलदीप यादवच्या फिरकीत ते फिसले. त्याने प्रमुख फलंदाज शाई होपला बोल्ड करत भारताला पहिला झटका दिला (36 धावा). त्यानंतर टेविन इमलाचला एल्बीडब्ल्यू आणि मग जस्टिन ग्रीव्सलाही बाद करत एकामागोमाग तीन बळी घेतले. मोहम्मद सिराजने जोमेल वॉरिकनला बोल्ड करत वेस्टइंडीजचा आठवा गडी बाद केला, तेव्हा त्यांचा स्कोर 175 होता. मात्र, खारी पियरे आणि अँडरसन फिलिप यांनी नवव्या विकेटसाठी चांगली झुंज दिली आणि 42 धावांची भागीदारी रचली. लंचनंतर मात्र जसप्रीत बुमराहने पियरेला (23 धावा) बोल्ड करत ती जोडी फोडली.

टीम इंडियाकडून कोणी किती विकेट्स पटकावल्या?

शेवटची विकेट मिळवण्यासाठी भारताला थोडा संघर्ष करावा लागला. फिलिप आणि जायडन सील्स यांनी 27 धावा जोडल्या. शेवटी कुलदीप यादवने सील्सला बाद करून वेस्टइंडीजचा डाव गुंडाळला आणि वेस्ट इंडिजला फॉलोऑन करण्यास भाग पाडले आहे. भारतीय संघानेही फॉलोऑन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजकडून अ‍ॅलिक अथानासेने 41 धावा केल्या, तर शाई होप आणि तेजनारायण चंद्रपॉल यांनी अनुक्रमे 36 आणि 34 धावा केल्या. तर कुलदीपने 82 धावांत 5 विकेट घेत आपला कसोटी कारकिर्दीतील पाचव्यांदा ‘फाईव्ह-फॉर’ पूर्ण केला. रवींद्र जडेजाने तीन, तर सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

आणखी वाचा

Comments are closed.