महाराष्ट्र आणखी तापणार, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) मे 2026 साठीचा मासिक अंदाज जाहीर केला असून देशातील बहुतांश भागात दिवस तुलनेने थंड, तर रात्री अधिक उष्ण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत नेहमीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

मे महिन्यात हिमालयाच्या पायथ्यालगतचे भाग, पूर्व किनारपट्टीवरील राज्ये तसेच गुजरात आणि महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा उत्तरी भाग, ईशान्य बिहार यासह ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिमेकडील गुजरात-महाराष्ट्र या राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे.

देशातील बहुतांश भागात पूर्व-मोन्सून पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता असल्याने दिवसा तापमान तुलनेने सामान्य किंवा कमी राहू शकते. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, “रात्री ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उष्णता बाहेर न जाता साठून राहते आणि त्यामुळे रात्री अधिक उष्णता जाणवते.”

त्याचबरोबर एल निनो (El Niño) प्रभाव मजबूत होण्याची शक्यता असल्याने यंदाचा मान्सून काहीसा कमकुवत राहू शकतो, ज्याचा शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढणे, ज्यामुळे हिंदुस्थानातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांत उष्णतेची लाट असेलेल्या दिवसांची संख्या सामान्यपेक्षा 1 ते 4 दिवसांनी जास्त राहू शकते. उष्णतेच्या लाटांचा धोका विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींना अधिक असतो. उष्माघात (heatstroke) आणि थकवा (heat exhaustion) यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

एप्रिल 2026 च्या आकडेवारीनुसार, देशातील 10 हवामान विभागांमध्ये उष्णतेच्या लाटेचे 25 दिवस नोंदवले गेले, जे सामान्यतः 36 विभागांमध्ये 71 दिवस असतात. दक्षिण द्वीपकल्पीय भागात एप्रिल 2026 हा 1901 नंतरचा सातवा सर्वात उष्ण आणि कोरडा महिना ठरला, तर उत्तर-पश्चिम हिंदुस्थानात पाचवा सर्वात उष्ण आणि कोरडा एप्रिल नोंदवला गेला.

2024 मध्ये दक्षिण भागात सर्वात उष्ण आणि कोरडा एप्रिल अनुभवला गेला होता. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात अतिवृष्टी व उष्णतेशी संबंधित घटनांमुळे 24 जणांचा मृत्यू झाला होता.

Comments are closed.