हिंदुस्थानला ऐतिहासिक सर्वसाधारण विजेतेपद; तब्बल 13 सुवर्णांसह 35 पदकांची लयलूट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी तलवारबाजांनी राष्ट्रकुल फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास घडवला. चार दिवसांच्या या स्पर्धेत हिंदुस्थानने तब्बल 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य अशा 35 पदकांची विक्रमी कमाई करत पहिल्यांदाच या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या देदीप्यमान कामगिरीमुळे हिंदुस्थानच्या शिरपेचात विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफीही विराजमान झाली.

वरिष्ठ सांघिक स्पर्धांमध्ये तर हिंदुस्थानी तलवारबाजांनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः नामोहरम केले. सहापैकी तब्बल पाच सांघिक सुवर्णपदके हिंदुस्थानने खिशात घातली. पुरुषांची साब्रे, महिलांची साब्रे, पुरुषांची एपी, महिलांची एपी आणि महिलांची फॉइल या प्रकारांत हिंदुस्थानने सोनेरी कामगिरी केली. मात्र, पुरुषांच्या फॉइलमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पहिल्याच दिवशी १७ पदकांची लयलूट

हिंदुस्थानच्या मोहिमेची सुरुवातच दणक्यात झाली. 23 वर्षांखालील वैयक्तिक प्रकारांत हिंदुस्थानने पहिल्याच दिवशी 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य अशी 17 पदके पटकावली. पुरुषांच्या साब्रे प्रकारात निखिल वाघने सुवर्णपदक जिंकत हिंदुस्थानचे वर्चस्व अधोरेखित केले. याशिवाय जॉयस अशिता (महिला फॉइल), प्राची लोहान (महिला एपी) आणि जेफर्लिन (महिला साब्रे) यांनीही सुवर्ण कामगिरी केली. वरिष्ट गटात वैयक्तिक प्रकारांच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने आणखी 7 पदकांची भर घातली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश होता. वरिष्ठ महिला एपीमध्ये तनिष्का खत्रीने सुवर्ण, तर खुशी डाभाडेने रौप्यपदक मिळवले. तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानी तलवारबाजांनी आणखी 3 सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी पाच पदके जिंकली. कनागलक्ष्मीने वरिष्ठ महिला फॉइलमध्ये, राजेंद्रन शांतिनमोल शेरजिनने वरिष्ठ पुरुष एपीमध्ये, तर सिंह करण सिंहने वरिष्ठ पुरुष साब्रे प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

खेळाडूंच्या मागे प्रशिक्षकांची सैन्य

या ऐतिहासिक यशामागे प्रशिक्षक भारती ठाकोर, श्रीहरी पिसे आणि शंकर नारायणन, फिजिओथेरपिस्ट अमृता बालकवडे आणि संघ व्यवस्थापक मनु त्यागी यांच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षण, शारीरिक तयारी आणि स्पर्धेचे नियोजन या सर्वच आघाडय़ांवर संघाने प्रभावी कामगिरी केली.

Comments are closed.