रोहित शर्मा MIचा कोच बनणार? विराट कोहली काय करणार, आर. अश्विनने केली मोठी भविष्यवाणी

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडू विविध क्षेत्रांकडे वळतात. काहीजण प्रशिक्षक किंवा समालोचक बनतात, तर काहीजण इतर जबाबदाऱ्या स्वीकारतात. मात्र, दीर्घ कारकीर्दीनंतर काही खेळाडू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देतात. भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली भविष्यात प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारतील का? याबद्दल भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने एक महत्त्वपूर्ण भाकीत केले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली भविष्यात अशा जबाबदाऱ्या स्वीकारतील का, असा प्रश्न अश्विनला विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, क्रिकेटमधून निवृत्त होताच मुंबई इंडियन्स या आयपीएल फ्रँचायझीने रोहित शर्माला प्रशिक्षकाच्या भूमिकेत आणले पाहिजे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अनेकदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे, परंतु विराट लगेचच प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असेल असे अश्विनला वाटत नाही.
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आर. अश्विनने सांगितले की, विराट कोहली लगेच प्रशिक्षक बनण्यास तयार असेल असे त्याला वाटत नाही. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीत मोठे यश संपादन केले आहे. भविष्यात रोहित शर्मा कदाचित कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मुंबई इंडियन्सशी जोडला जाऊ शकतो, पण विराटच्या बाबतीत तसे नक्की सांगता येणार नाही. अश्विनच्या मते, विराट कदाचित काही काळ विश्रांती घेण्याला पसंती देईल.
अश्विनच्या मते, नजीकच्या काळात फ्रँचायझी क्रिकेटचे वर्चस्व आणखी वाढणार आहे. परिणामी, यशस्वी क्रिकेटपटूंसाठी मार्गदर्शक (मेन्टर), डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि हाय-परफॉर्मन्स डायरेक्टर यांसारख्या विशेष भूमिकांमध्ये संधी उपलब्ध होतील.
रोहित शर्मा सध्या त्याच्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. रोहित भविष्यात नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मुंबई इंडियन्सशी जोडलेला राहील, असा विश्वास अश्विनला वाटतो.
अश्विनने पुढे सांगितले की, जर रोहितने उद्या क्रिकेट खेळणे थांबवण्याचा निर्णय घेतला, तर मुंबई इंडियन्सने त्याला त्वरित आपल्या ताफ्यात सामील करून घेतले पाहिजे. रोहितने मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकही जिंकला आहे. अशा दर्जाचे खेळाडू दुर्मिळ असतात.
रोहितची मुख्य प्रशिक्षक जी एक अत्यंत आव्हानात्मक भूमिका आहे. ती भूमिका लगेच स्वीकारण्याची इच्छा नसेल, तरीही काही फरक पडणार नाही. एक-दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर, ते नक्कीच एखादी भूमिका स्वीकारण्यास तयार होईल. राहुल द्रविड यांनीही विश्रांती घेतल्यानंतर क्रिकेटशी संबंधित कामात पुनरागमन केले होते. अशा दिग्गज क्रिकेटपटूंना फ्रँचायझींनी आपल्या संघात कायम ठेवावे आणि त्यांना हातातून जाऊ देऊ नये, यावर अश्विनने भर दिला.
Comments are closed.