श्रीलंकेत क्रिकेट सामन्यादरम्यान पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद, हल्ल्यात प्रशिक्षकाचा मृत्यू

श्रीलंकेत 15 ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुसल मेंडिस यांना शालेय जीवनात प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक सुमित फर्नांडो यांचा क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादातून मृत्यू झाला आहे.

कोलंबोमध्ये 8 ऑगस्ट रोजी एका क्रिकेट सामन्यादरम्यान पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. या वादात सुमित फर्नांडोही सहभागी झाले. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 11 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

62 वर्षीय सुमित फर्नांडो यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन खेळाडूला 10 ऑगस्ट रोजी अटक केली. त्याला 11 ऑगस्ट रोजी कोलंबो न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टपर्यंत बाल सुधारगृहात पाठवले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर खेळाडूंचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सुमित फर्नांडो हे मोरातुवा येथील प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजचे माजी क्रिकेट प्रशिक्षक होते. त्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुसल मेंडिस यांच्यासह अनेक युवा क्रिकेटपटूंना त्यांच्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षक म्हणून काम करण्यासोबतच त्यांनी पिच क्युरेटरची जबाबदारीही सांभाळली होती.

सुमित फर्नांडो यांच्यावर 13 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.