फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताने पाच सुवर्णपदके जिंकली.

महाराष्ट्रातील दोघांची चमक : पंतप्रधानांकडून विजेत्यांचे कौतुक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोलंबियातील बुकारामांगा येथे या महिन्याच्या 4 ते 12 तारखेदरम्यान आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र (फिजिक्स) ऑलिम्पियाड 2026 मध्ये पाच भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडले, नवी दिल्लीचा ऋषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. या कामगिरीसह 87 देशांतील 381 विद्यार्थ्यांमध्ये भारताने रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला.

56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये पाच सुवर्णपदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चमूचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी ‘ही कामगिरी देशाच्या ‘युवा शक्ती’ची अफाट क्षमता आणि विज्ञान व संशोधनाबद्दलची त्यांची आवड प्रतिबिंबीत करत असे म्हटले आहे. गेल्या दशकात ऑलिम्पियाडच्या विविध आवृत्त्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ही बाबही तितकीच कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ. अजित कुमार मोहंती यांनीही पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. युवा स्पर्धकांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे वर्णन देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

87 देशांतील 381 विद्यार्थ्यांचा सहभाग

या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 87 देशांतील 381 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या यशामुळे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधील भारताचा प्रभावी विक्रम आणखी मजबूत झाला आहे. यावर्षी प्रत्येक भारतीय सहभागीने पदक जिंकले. भारताच्यावतीने या कार्यक्रमाचे नेतृत्व ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’ आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या केंद्रांनी केली.

भारताला संयुक्तपणे ‘जागतिक क्रमांक 1’चे स्थान

भारताने 87 देशांतील 381 सहभागींना मागे टाकत संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले. भारताने चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत जागतिक क्रमांक 1 चे स्थान विभागून घेतले. सर्व पाच भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकली. या विद्यार्थ्यांनी जगभरातील 87 देशांतील 381 विद्यार्थ्यांमध्ये आपले स्थान मिळवले. स्पर्धेत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांसोबतच रौप्य आणि कांस्य पदकेही प्रदान करण्यात आली.

Comments are closed.