अवघ्या 30 व्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती; आरसीबीसाठीही खेळली क्रिकेट
भारतीय महिला क्रिकेटपटू सब्बीनेनी मेघनाने शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने क्रिकेटला अलविदा करत सर्वांनाच थक्क केले. मेघनाने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 2022 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती भाग होती. तसेच महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) मेघना आरसीबी (RCB) संघाकडूनही खेळली होती.
आंध्र प्रदेशच्या 30 वर्षीय मेघनाने 2016 ते 2022 दरम्यान भारतासाठी 3 एकदिवसीय (ODI) आणि 17 टी-२० सामने खेळले. तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 114 धावा आणि टी-20 मध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 258 धावा केल्या. मेघना महिला प्रीमियर लीगमध्येही खेळलेली आहे. 2024 मध्ये जेतेपद पटकवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा ती एक भाग होती.
मेघनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “जागतिक स्तरावर जर्सी परिधान करण्यासाठी हातात बॅट घेऊन पहिल्यांदा मैदानावर उतरणे हे एखाद्या स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नव्हते. मी एक खेळाडू म्हणून क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करते. माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे. मैदान हे माझे दुसरे घर राहिले आहे, ज्याने मला हिंमत दिली, नम्रता शिकवली आणि अशा आठवणी व मैत्री दिली, ज्या मी आयुष्यभर जपून ठेवीन.”
तिने पुढे लिहिले, “माझ्या कुटुंबाचे, जे प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तुमच्या कधीही न संपणाऱ्या त्यागासाठी मनापासून आभार. माझे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचे मला माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल आणि माझ्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्याबद्दल धन्यवाद.”
तिने पुढे लिहिले, “मी बीसीसीआय (BCCI), आंध्र क्रिकेट असोसिएशन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात जायंट्स आणि आरएसपीबी (RSPB) यांचे माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सतत सहकार्य, मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभार मानू इच्छिते. माझे खेळण्याचे दिवस संपले असले तरी क्रिकेटशी असलेले माझे नाते कधीही तुटणार नाही. मी नेहमीच या खेळाशी मनापासून जोडलेली राहीन आणि माझे आयुष्य या खेळाला काहीतरी परत देण्यासाठी, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि ज्या खेळाने मला सर्व काही दिले त्याची सेवा करण्यासाठी समर्पित करू इच्छिते. धन्यवाद, क्रिकेट. तू नेहमीच माझ्या हृदयात, माझ्या ध्यासामध्ये आणि माझ्या आयुष्याच्या ध्येयामध्ये राहशील.”
Comments are closed.