आईला वाचवताना लेकाचा अंत… अमेरिकेत हिंदुस्थानीच्या नावाने कायदा
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या दुर्घटनेत हिंदुस्थानी नागरिक रोमांच महाजन याने जीव गमावला. त्याच्याच नावे अमेरिकेत ‘रोमांच’ कायदा मंजूर झाला आहे. हा कायदा लागू झाल्याने न्यूयॉर्क शहरात पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेली घोडागाडय़ांची सफर इतिहासजमा झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये गेल्या 150 वर्षांपासून घोडागाडीची परंपरा आहे.
पंजाबच्या पठाणकोटचा रहिवासी रोमांच महाजन त्याच्या कुटुंबासह न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये घोडागाडीत बसला होता. त्यावेळी घोडा अचानक खिंकाळला आणि बग्गीसह जोरात पळाला. रोमांचची आई प्रिया बग्गीतून खाली पडली. आईला वाचवण्यासाठी रोमांचने उडी मारली. या अपघातात प्रिया यांना किरकोळ दुखापत झाली, पण रोमांचच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर न्यूयॉर्कमधील अनेक संस्था आणि नेते पुढे आले. त्यांनी रायडर कायद्याला रोमांचचे नाव देण्याची मागणी केली.
‘रायडर लॉ’ नावाने ओळखला जाणारा कायदा यापुढे रोमांचच्या आठवणीत ‘रोमांच लॉ’ नावाने ओळखला जाईल. या कायद्याच्या बाजूने 49 पैकी 40 मते पडली.
सर्वेक्षणांनुसार न्यूयॉर्कमधील 70 टक्के नागरिक घोडागाडी उद्योग बंद करण्याच्या बाजूने आहेत. घोडय़ांना भीषण उन्हात आणि कडाक्याच्या थंडीत काँक्रीटच्या रस्त्यांवर पळवले जाते. त्यामुळे त्यांना श्वास आणि पायांचे गंभीर आजार होतात.
Comments are closed.