समुद्रात हिंदुस्थानची ताकद आणखी वाढली, INS Mangrol नौदलाच्या ताफ्यात दाखल
हिंदुस्थानी नौदलाने सोमवारी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस मांगरोळ ही अत्याधुनिक युद्धनौका अधिकृतपणे आपल्या ताफ्यात समाविष्ट केली. माहे-क्लास श्रेणीतील ही तिसरी अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट युद्धनौका असून, यामुळे हिंदुस्थानच्या किनारपट्टीवरील सुरक्षेला आणि पाणबुडीविरोधी युद्धाच्या क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
किनारपट्टी आणि उथळ पाण्यातील मोहिमांसाठी विशेष डिझाइन केलेली ही युद्धनौका पाण्याखालील पाळत ठेवणे, लो-इंटेन्सिटी मॅरिटाइम ऑपरेशन्स आणि माईन वॉरफेअर सारख्या ऑपरेशन्ससाठी अत्यंत उपयुक्त आहे. पाण्याखालील संभाव्य धोके शोधून काढून त्यांना अचूक प्रत्युत्तर देण्यासाठी यावर प्रगत सेन्सर्स, अत्याधुनिक सोनार प्रणाली आणि प्रगत शस्त्रास्त्रे बसवण्यात आली आहेत. तसेच, तीन डिझेल इंजिन-चालित वॉटरजेट प्रोपल्शन युनिट्समुळे हे जहाज उथळ आणि मर्यादित पाण्यातही वेगाने आणि अचूक हालचाल करू शकते.
Comments are closed.