Asian Games 2026: रिलेमध्ये मुलींची कमाल! भारताने जिंकले सहावे 'गोल्ड मेडल', पदकतालिकेत भारत टॉप-10 मध्ये

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मंगळवारचा (29 सप्टेंबर) दिवस भारतासाठी चांगला ठरला आहे. भारताच्या महिलांनी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. शॉटगन नेमबाज नीरु धांडाने महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदकाची कामगिरी केली, तर भारतीय महिलांच्या 4×400 मीटर रिले संघानेही सुवर्णपदक जिंकले.

भारताच्या या सुवर्णविजेत्या संघात किरण, मचेत्तिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांचा समावेश होता. भारतीय संघाने शर्यत 3 मिनिटे 29.69 सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीत बहरीनने रौप्य (3:30.21) आणि चीनने कांस्य (3:31.02) पदक पटकावले.

विथ्या रामराजचे दुसरे पदक
धावपटू विथ्या रामराजचे हे या स्पर्धातील दुसरे पदक ठरले आहे. याआधी तिने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक पटकावले होते. आता तिने सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे.

ऍथलेटिक्समधील भारताचे पहिले गोल्ड
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत क्रिकेट, कबड्डी आणि नेमबाजीमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत. रिलेचे सुवर्ण पदक हे भारताचे या स्पर्धेच्या ऍथलेटिक्समधील पहिले सुवर्ण ठरले आहे. याचबरोबर भारताने पदक तालिकेत 50 चा आकडाही पार केला आहे.

पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला कांस्य
भारताच्या पुरुष संघाने 4×400 मीटर रिलेमध्ये कांस्य पदक पटकावले. भारताने ही शर्यत 3 मिनिटे 01.61 सेकंदात पूर्ण केली. या संघात धर्मवीर चौधरी, मनु थेक्किनालिल, विशाल थेनरसू
आणि जय कुमार यांचा समावेश होता. जपान (3:00.75) सुवर्ण, तर कतार (3:00.93) रौप्य पदकाचे मानकरी ठरले.

दोन्ही शर्यतीदरम्यान पाऊस पडत होता, मात्र भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.

पदक तालिकेत भारत टॉप-टेनमध्ये?
भारत सहा सुवर्ण पदकासह पदकतालिकेत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या पदकांची संख्या 52 झाली असून त्यात 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Comments are closed.