अवघ्या 22 व्या वर्षी श्री चरणीची जागतिक विक्रमाला गवसणी, वाचा…
Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवत सुवर्णपदक पटकावलं. संघाच्या विजयात 22 वर्षांच्या श्री चरणीचा खारीचा वाटा राहिला. तिने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोक्याच्या क्षणी विकेट घेत संघाला खंबीर साथ दिली. आशिय कपमध्येही तिचा खेळ दमदार राहिला. तिच्या याच धडाकेबाज कामगिरीचं फळ तिला मिळालं आहे. श्री चरणी टी-20 फॉरमॅटमध्ये 817 रेटिंग पॉईंट्ससह जगातील सर्वोच्च रेटिंग मिळवणारी गोलंदाज ठरली असून तिने 8 वर्ष जुना विक्रम मोडित काढला आहे.
श्री चरणीचा खेळ मागील वर्षभरात दमदार राहीला आहे. आशियाई कपमध्ये तिने संपूर्ण स्पर्धेत 12 विकेट घेत हिंदुस्थानला आठव्यांदा आशिया कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चालू वर्षांचा विचार करता तिने आतापर्यंत एकूण 39 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारी हिंदुस्थानी गोलंदाजी बनली आहे.
तिची हीच चमकदार कामगिरी जपानमधील एशियन गेम्समध्येही पाहायला मिळाली, जिथे तिने जपानविरुद्ध 10 धावांत 4 विकेट्स घेत संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातही तिने 2 बळी टिपत हिंदुस्थानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सलग अप्रतिम कामगिरीच्या जोरावर तिने 817 रेटिंग पॉईंट्सचा आकडा गाठला आहे, तर याच क्रमवारीत दीप्ति शर्मा 754 पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेगन शट हिचा 806 रेटिंग पॉईंट्सचा जवळपास आठ वर्षे जुना विक्रम श्री चरणीने मोडित काढला आहे.
Comments are closed.