ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबत नसल्याचं चित्र आहे. शेअर बाजारात दररोज घसरण सुरु आहे. 12 मार्चला देखील शेअर बाजार कोसळला.सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. या घसरणीमुळं बीएसई सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्याचं बाजारमूल्य 2 लाख कोटींनी कमी झालं, म्हणजेच गुंतवणूकदारांचे एका दिवसात 2 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. या घसरणीमागं चार प्रमुख कारणं आहेत. या घसरणीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देखील कनेक्शन आहे.
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 829.29 अंकांच्या घसरणीसह 76034.42 अंकांवर पोहोचला. तर, दुसरीकडे निफ्टी 50 मध्ये देखील 227.70 अंकांची घसरण झाल्यानं तो निर्देशांक 23639.15 अंकांवर पोहोचला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य आज 2 लाख कोटींनी कमी होऊन 440 लाख कोटींवर आलं आहे.
भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. यामुळं जगभरातील विविध देशांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी क्रूड ऑईलच्या दरात झालेल्या वाढीचा देखील शेअर बाजारावर परिणाम दिसून आला.
डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात धक्का बसला होता. त्यानंतर अमेरिकेनं जगातील 16 देशांविरोधात व्यापार चौकशी सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय 1974 च्या व्यापार कायदा कलम 301 नुसार घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर जे 16 देश आहेत, त्याच भारताचा देखील समावेश आहे. भारत, चीन, यूरोपियन यूनियन, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, तैवान, व्हिएतनाम, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बांग्लादेश, नॉर्वे आणि स्वित्झरलँडचा त्यात समावेश आहे.
आखाती देशांमधील संघर्ष वाढल्यानं क्रुड ऑईलच्या पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रुड आईलच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यानं प्रति बॅरलचा दर 100 डॉलरच्या वर गेला आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात देखील घसरण पाहायला मिळत असल्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. अमेरिकन शेअर मार्केट, आशियाई बाजार ज्यात जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरियातील शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली. गिफ्ट निफ्टीतही घसरण झाली.
जागतिक तणावाचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. इंडिया VIX निर्देशांकात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. हा निर्देशांक 22.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळं शेअर बाजार क्रॅश झाल्याचं पाहायला मिळालं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.