पंजाबच्या तरुणावर न्यूयॉर्कमध्ये गोळीबार, पिझ्झा डिलिव्हरीसाठी गेला असता घडली घटना
पिझ्झा डिलिव्हरी करायला गेलेल्या हिंदुस्थानी तरुणाची अमेरिकेत अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरदीप सिंग (28) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. न्यूयॉर्क शहरातील स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरदीप सिंग हा मूळचा पंजाबमधील बेगोवाल येथील रहिवासी आहे. नोकरीनिमित्त गुरदीप 13 वर्षांपूर्वी अमेरिकेत गेला होता. अमेरिकेत जाण्यासाठी गुरदीपने मोठे कर्ज घेतले होते. तिथे पोहोचल्यानंतर त्याला दीर्घकाळ अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आपल्या कुटुंबाला चांगले आयुष्य मिळावे यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
हा हल्ला लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. गुरदीपच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गुरदीपच्या पश्चात वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. गुरदीपचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी मदत करण्याची विनंती कुटुंबाने केली आहे. तसेच, आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षेची मागणीही त्यांनी केली आहे.
Comments are closed.