ब्रेकिंग! भारताच्या अनुभवी स्पिनरने जाहीर केली आंतरराष्ट्रीय निवृत्ती; टीम इंडियाकडून खेळला ‘इतके’ सामने, चार वेळा IPL चॅम्पियन

कोलंबोमध्ये भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे. अशातच एका अनुभवी फिरकीपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. भारताचा लेगस्पिनर कर्ण शर्मा याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटबरोबर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
कर्णने त्याच्या निवृत्तीची घोषणा शनिवारी (22 ऑगस्ट) रात्री युपी टी20 लीगमधील कानपूर सुपरस्टार्स विरुद्ध मेरठ मॅव्हरिक्स या सामन्यानंतर केली. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
38 वर्षीय खेळाडूने निवृत्त होताना म्हटले, “मला आता निवृत्त व्हायचे आहे. मी माझे कुटुंब, बीसीसीआय, रेल्वे, यूपीसीए, आंध्र, विदर्श क्रिकेट असोसिएशन आणि या संपूर्ण प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे.”
कर्ण शर्माची देशांतर्गत कारकिर्द
कर्णने 2007-08 च्या देशांतर्गत हंगामातून प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी 20 पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शतकी खेळी केली. तसेच त्याचा 2012-13 हंगाम सर्वांत यशस्वी ठरला. त्याने त्यामधील तीन रणजी ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आणि BCCI चा सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला.
कर्णने 97 प्रथम श्रेणीच्या सामन्यांमध्ये 270 विकेट्स घेतल्या आणि 2866 धावा केल्या. 123 लिस्ट ए सामन्यांमध्ये 153 विकेट्स घेतल्या आणि 1827 धावा केल्या. तसेच त्याने 191 टी 20 सामन्यांमध्ये 168 विकेट्स घेतल्या.
कर्ण शर्माची भारतीय संघासोबतची कारकिर्द
कर्णने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने भारतीय संघातकडून एक कसोटी, दोन वनडे आणि एक टी20 सामना खेळला आहे. त्याने या सामन्यांमध्ये मिळून एकूण 5 विकेट्स घेतल्या.
कर्णची आयपीएल कारकिर्द
कर्णच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्याचे आयपीएलमधील (इंडियन प्रीमियर लीग) यश. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद (2016), मुंबई इंडियन्स (2017) आणि चेन्नई सुपर किंग्जकडून (2018, 2021) खेळला आणि चारवेळा आयपीएल विजेता ठरला.
कर्णने आयपीएलच्या 90 सामन्यांच्या 87 डावांमध्ये खेळताना 352 धावा केल्या आणि 83 विकेट्स घेतल्या.
देशांतर्गत क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत, लेगस्पिनरने दीड दशकाहून क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द छोटी असली तरी, त्याला शांत स्वभावाचा फिरकी गोलंदाज आणि चार वेळेचा आयपीएल चॅम्पियन म्हणून तो कायम चाहत्यांच्या लक्षात राहील.
Comments are closed.