भारताचा परकीय चलन साठा वाढतो
एकंदर साठा 703.308 अब्ज डॉलर्स पातळीवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताकडे असणारा परकीय चलन साठा आता 700 अब्ज डॉलर्सहून अधिक झाला आहे. भारतीय चलनात याची किंमत जवळपास 64 लाख कोटी रुपये इतकी आहे. 17 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात या साठ्यात 236.2 कोटी डॉलर्सची भर पडली आहे. 7 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात हा साठा 728.494 अब्ज डॉलर्स या तोवेळपर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहचला होता. आता त्यात आणखी भर पडली आहे. मात्र, मधल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे साठ्यात घसरण झाली होती.
चलन साठ्याचे मूल्य प्रामुख्याने डॉलर, येन, ब्रिटीश पेड इत्यादी परकीय चलनांच्या भारतीय चलनाच्या किमतीवर अवलंबून असतो. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरलेली आहे. तरीही विदेशी चलन साठ्यात वाढ झाली आहे, हे महत्वाचे मानले जात आहे. भारताची अर्थव्यवस्था सुस्थिर असल्याचा हा परिणाम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात लवकर चर्चा होऊन तोडगा निघाल्यास भारताचे चलन आणि परकीय चलनाचा साठा यांच्या मूल्यात वाढ होणार आहे.
वाढला सोन्याचा साठाही
भारताच्या सोन्याच्या साठ्यातही काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात त्यात 79 कोटी डॉलर्सची वाढ झाली. आता एकंदर सोन्याचा साठा 122.133 अब्ज डॉलर्सवर पोहचला असून हा गेल्या काही काळामधील विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतल्या भारताच्या गुंतवणुकतही वाढ झाली असून आता ही गुंतवणूक 4.87 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. त्याचप्रमाणे स्पेशल ड्रॉइँग अधिकाराची मर्यादाही 18.441 अब्ज डॉलर वर पोहचली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली असून समाधान व्यक्त करण्यात आले.
स्पॉट मार्केटमध्ये मोठी खरेदी
गेल्या आठवड्यात स्पॉट मार्केट व्यवहारांमध्ये मोठी वाढ दिसून आली. एकंदर फॉरवर्ड विक्री 77.7 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. भारताची रिझर्व्ह बँक आजही फॉरवर्ड सेलिंग व्यवहारांवर अधिक प्रमाणात अवलंबून आहे., हे दिसून आले आहे. भारताने केलेली ही चांगली कामगिरी मात्र, मार्च महिन्यात झालेल्या युद्धसंघर्षामुळे दबावाखाली आली होती, असेही दिसून येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डॉलरच्या खरेदीतही वाढ केली असून आता भारतीय चलनाची डॉलरमधील किंमतही स्थिरावण्याच्या मार्गावर आहे. चलनाच्या मूल्यातील अस्थिरता आता नाहीशी होत असून रुपया अधिक प्रमाणात स्थिरावल्याचे पहावयास मिळत आहे.
Comments are closed.