दक्षिण आफ्रिकेत अंदाधुंद गोळीबार; 27 ठार.
दोन शहरांमध्ये गोळीबाराच्या घटना : गौतेंग अन् केपटाउनमध्ये हत्यासत्र
वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेच्या बारमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 13 पुरुष आणि 4 महिला सामील आहेत. ही घटना शनिवारी रात्री दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गच्या दक्षिणेला असलेल्या वेडेला वसाहतीत घडली आहे. केपटाउन या शहरातही गोळीबाराची घटना घडली असून यात 10 जणांना जीव गमवावा लागला आहे.
गौतेंगमध्ये गोळीबारापूर्वी लोक पार्टी करत होते. यादरम्यान हल्लेखोर एके-47 घेऊन आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान सुरू केले आहे. तर त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्वा-मखुथा भागात सामूहिक गोळीबार झाला होता, यात 12 जणांना जीव गमवावा लागला होता.
गौतेंग येथील बारमध्ये 8 अज्ञात हल्लेखोर पोहोचले होते. या हल्लेखोरांनी तेथे मद्यपान करणाऱ्या लोकांच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. तर या गोळीबारामधील कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्लेखोरांकडे एके-47 रायफलसोबत पिस्तुलही होते. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी काही लोकांची झडती घेत त्यांचे मोबाइल काढून घेतले. यानंतर हल्लेखोर दोन वाहनांमध्ये बसून घटनास्थळावरून फरार झाले. तर याप्रकरणी आतापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही.
केपटाउनमध्ये गोळीबार
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये देखील गोळीबाराची घटना घडली आहे. ल्वांडले भागात रविवारी पहाटे एका दुकानावर झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हल्लेखोर आणि हल्ल्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपास जारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Comments are closed.