केदारनाथ मार्गावर दरड कोसळली; 4,000 यात्रेकरू अडकले.
उत्तर प्रदेशातही जोरदार पाऊस, बिहारमध्ये 500 घरे पाण्याखाली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तराखंडच्या सर्व जिह्यांमध्ये शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ऋषिकेशमध्ये गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, घाटांवरील प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. दरम्यान, रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन झाल्याने अंदाजे 4,000 भाविक अडकले आहेत. खराब हवामानामुळे रविवारी केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, हेलिकॉप्टर सेवा देखील रद्द करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, उन्नाव, बाराबंकी, अयोध्या आणि जौनपूरसह 45 शहरांमध्ये तीन दिवसांपासून सतत कमी-अधिक पाऊस पडत आहे. तसेच ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. 22 जिह्यांमध्ये अचानक येणाऱ्या पुराचा धोका आहे. वादळ आणि पावसामुळे दोन दिवसांत 62 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये अर्णब चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. नेपाळच्या तराई प्रदेशात झालेल्या पावसामुळे गंडक आणि कोसी नद्यांना पूर आला आहे. यामुळे 17 जिह्यांमधील जवळपास 6,000 गावे बेटांसारखी झाली असून, सुमारे 500 घरे पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत. सुपौलमधील 50 गावांमध्ये पूरस्थिती कायम आहे.
उत्तराखंडच्या सर्व जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रविवारी राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. देहराडून, टिहरी, हरिद्वार आणि पौरी येथे रेड अलर्ट, उत्तरकाशी, चमोली, नैनिताल आणि रुद्रप्रयाग येथे ऑरेंज अलर्ट, तर बागेश्वर, अल्मोरा, चंपावत, उधम सिंग नगर आणि पिथोरगड येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments are closed.