‘अक्षय्य’ महागाई… मध्यमवर्गाच्या त्रासाची ‘तृतीया’
इराण युद्धामुळे वाढलेले इंधनाचे भाव… घसरत चाललेला रुपया आणि सरकारकडून कुठलाही दिलासा मिळत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महागाई अक्षय्य आहे. मागच्या काही काळात महागाईचा दर 1.75 टक्क्यांवरून 3.88 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईच्या दरातील ही वाढ जवळपास तिप्पट असल्याने त्रासाची ’तृतीया’ साजरी करण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर आली आहे.
इराण युद्धामुळे खाण्यापिण्याच्या व दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचा परिणाम महागाईच्या दरावर झाला आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर 3.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. युद्ध लांबल्यामुळे त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे. युद्धाचा हिंदुस्थानात सणासुदीच्या सोनेखरेदीवर झाला आहे. गुढी पाडव्याला नेहमीप्रमाणे सोने खरेदीची लगबग दिसली नाही. लोकांनी सोन्याऐवजी अन्य वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर वाढत असताना प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल सोने खरेदीचा पर्याय जास्त लोकप्रिय झाला आहे. तज्ञांच्या मते, डिजिटल गुंतवणुकीमध्ये लवचिकता आणि पारदर्शकता असल्यामुळे ग्राहकांचा त्याकडे कल वाढला आहे.
सोने 1 लाख 55 हजार! कसे परवडणार?
यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोने 10 टक्क्यांनी वाढून दीड लाखांवर गेले आहे. अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी, शनिवारी 24 कॅरेटचा दर 1,328 रुपयांनी वधारून 1.55 लाखांवर गेला. त्यामुळे सोने घ्यायचे कसे असा प्रश्न आहे.
बजेट कोलमडले
मध्यमवर्गीय माणूस थोडे थोडे पैसे जमा करत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करतो. मात्र सर्व बाजूंनी महागाई वाढल्याने लोकांचे बजेट कोलमडले आहे. त्याचा परिणाम सोने खरेदीवर होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.