'प्रभावशाली' दाव्यामुळे खळबळ उडाली
सीजेपीचे आंदोलन, आरोपीला तत्काळ अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै महिन्यात दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातील एका आंदोलकाच्या वडिलांना आपण मारहाण केली असूनही आपल्याला अटक झालेली नाही, असा दावा पॉडकास्टमध्ये करणाऱ्या एका इन्फ्ल्यूएन्सरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अटक करावी या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या 50 कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलीस स्थानकानजीक आंदोलन केले. 72 तासांमध्ये संशयिताला अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
स्वतंत्र भारद्वाज असे या संशयिताचे नाव आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये अशी मारहाण केल्याची बढाई मारली होती. आपण त्या आंदोलकाच्या पित्याची हाडे मोडली, असे त्याचे प्रतिपादन होते. तथापि, पोलिसांनी इतक्या तीव्रतेची मारहाण झालेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात या आंदोलकाकडून एफआयआर सादर करण्यात आलेला नाही, असेही वृत्त आहे.
पोलीस स्थानकासमोर आंदोलन
पॉडकास्ट प्रसिद्ध झाल्यानंतर सीजेपीने भारद्वाज याला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर 50 कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन तेथे ठिय्या आंदोलन केले. साधारणत: 3 तास आंदोलन चालले. पोलीस स्थानक अधिकाऱ्याने आंदोलकांची भेट घेऊन त्यांना 72 तासांमध्ये भारद्वाज याला अटक करण्याचे आश्वासन दिले. नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पोलिसांनी नंतर चक्रे फिरवून भारद्वाज याला अटक केली आहे. भारद्वाज याने पॉडकास्टमध्ये जो दावा केला आहे, त्याची पडताळणी करून नंतर त्याच्याविरोधात कारवाई होणार आहे.
राजकीय वळण
या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. ज्या आंदोलकाच्या वडिलांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता, तिने राहुल गांधी यांचे साहाय्य मागितले अशी माहिती देण्यात आली. गांधी यांनी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पोलीस स्थानकावरील आंदोलनालाही पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्ली पोलीस विद्यार्थी आंदोलकांवर अनन्वित अत्याचार करत असून त्यांना क्रूरतेची वागणूक देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रत्यारोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला.
प्रकरण नेमके काय
दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात निशू आझाद नामक 14 वर्षीय युवतीने सहभाग घेतला होता. तिचे वडील संजय कुमार हेही तिच्यासह होते. संजय कुमार यांचा आरोपी भारद्वाज याच्याशी वाद झाला आणि भारद्वाज आणि त्याचा एक सहकारी यांनी संजय कुमार यांना मारहाण केली, असा आरोप आहे. कुमार यांनी त्वरित तक्रार सादर केली होती. त्यानुसार भारद्वाज याला ताब्यात घेण्यात आले होते. आता या प्रकरणात भारद्वाज याचा पॉडकास्टमधील दावा लक्षात घेऊन त्याच्यावर आरोपपत्र सादर करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
Comments are closed.