विमा-पीयूसी थकीत, वाहने थेट आर्काइव्हमध्ये! वाहनधारकांना मोबाईलवर धडकले संदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाहनाचा विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राचे (पीयूसी) अनेक वर्षांपासून नूतनीकरण न केलेल्या  वाहनधारकांच्या मोबाईलवर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून संदेश पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये संबंधित वाहन ‘परमनंट आर्काइव्ह’मध्ये हलविण्यात आल्याचे या संदेशांद्वारे कळविले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकासह मोबाईलवर हे संदेश प्राप्त होत आहेत. विशेषतः अनेक वर्षांपासून वाहनाचा विमा आणि पीयूसीसी प्रमाणपत्र अद्ययावत न केलेल्या वाहनमालकांना असे संदेश येत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित वाहनाचा विमा आणि पीयूसीसीचे दीर्घकाळ नूतनीकरण न झाल्याने ते ठरावीक तारखेपासून ‘परमनंट आर्काइव्ह’मध्ये हलविण्यात आल्याचे संदेशात नमूद केले आहे. तसेच, मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक नियमांचे पालन न करता वाहन चालविणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचा इशाराही या संदेशातून देण्यात आला आहे. पुढील माहितीसाठी संबंधित आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

काही वाहनधारकांनी संदेश मिळाल्यानंतर आरटीओ कार्यालयात जाऊन चौकशीही सुरू केली आहे. मात्र, वाहन ‘परमनंट आर्काइव्ह’मध्ये हलविण्याची नेमकी कार्यपद्धती काय आहे, अशा वाहनांची नोंदणी पुन्हा सक्रिय करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, याबाबत केंद्रीय मंत्रालयाकडून आरटीओ कार्यालयांना अद्याप स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कार्यालयीन स्तरावरही संभ्रम कायम आहे. केंद्रीय मंत्रालयाने याबाबत तातडीने स्पष्टीकरण देऊन वाहने पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया जाहीर करावी, अशी मागणी आता वाहनधारकांकडून होत आहे.

आरटीओकडेही स्पष्ट सूचना नाहीत

केंद्रीय मंत्रालयाकडून वाहन ‘परमनंट आर्काइव्ह’मध्ये हलविण्याबाबतचे संदेश पाठविले जात असले, तरी ही वाहने पुन्हा सक्रिय करण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया राबवायची, याबाबत आरटीओ कार्यालयांना अद्याप अधिकृत मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. विमा आणि पीयूसीसी अद्ययावत केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे चौकशीसाठी येणाऱया वाहनधारकांना अधिकारीही ठोस उत्तर देऊ शकत नाहीत.

Comments are closed.