कोकण रेल्वे मार्गावर विलंबाचे दुष्टचक्र; मांडवी एक्सप्रेसच्या मुंबईहून होणाऱ्या प्रस्थानावर परिणाम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांना उशीर होण्याचे दुष्टचक्र लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्ट दर्जा दिल्यानंतर केलेल्या बदलाचा मांडवी एक्सप्रेसच्या मुंबईहून होणाऱ्या प्रस्थानावर परिणाम झाला आहे. प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून कोकणकन्या आणि मांडवी या गाड्यांचे परिचालन पूर्वीप्रमाणे प्रवाशांच्या सोयीचे करावे, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्ट दर्जा दिल्यानंतर तिचे क्रमांक 10111/10112 वरून 20111/20112 असे बदलण्यात आले. तसेच मडगाव येथून सुटण्याची वेळ सायंकाळी 6 वरून 7 वाजता करण्यात आली. एका तासाच्या बदलामुळे संपूर्ण रेक लिंक आणि देखभाल वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. पूर्वी मांडवी एक्सप्रेस मडगाव येथे पोहोचल्यानंतर तिच्या रेकची देखभाल व दुरुस्ती केली जात होती. मात्र सध्याच्या व्यवस्थेत 20111 कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव येथे पोहोचल्यानंतर तिच्या रेकची देखभाल व दुरुस्ती केली जाते. 20111 कोकणकन्या एक्सप्रेस अनेकदा विलंबाने सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजल्यानंतर पोहोचते. त्यामुळे तिच्या रेकच्या देखभालीसाठी उपलब्ध असलेला अवधी कमी होतो.

'कोकणकन्या'चा सुपरफास्ट दर्जा रद्द करा

कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द करावा. गाडीचे पूर्वीचे 10111/10112 क्रमांक पुनर्स्थापित करून पूर्वीच्या मेल/एक्सप्रेस स्वरूपात परिचालन करावे, मडगाव येथून सुटण्याची पूर्वीची वेळ पुनर्स्थापित करावी. कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव येथून पूर्वीप्रमाणे सायंकाळी 6 वाजता सोडण्यात यावी, मांडवी एक्सप्रेसच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही यादृष्टीने परिचालन व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे अध्यक्ष जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी केली आहे.

Comments are closed.