अमित जोगी यांना अंतरिम दिलासा
सर्वोच्च न्यायालयाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती : सीबीआयकडून मागवले उत्तर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने 2003 च्या राम अवतार जग्गी हत्या प्रकरणात अमित जोगी यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आत्मसमर्पणासाठी असलेल्या गुरुवारच्या अंतिम मुदतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने अमित जोगी यांच्या विशेष रजा याचिकेवर (एसएलपी) सुनावणी करताना हा आदेश दिला.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडून उत्तर मागवले आहे. अमित जोगी यांनी दोन आदेशांना आव्हान दिले आहे. पहिला आदेश सीबीआयला अपील करण्याची परवानगी देण्यासंबंधी असून दुसरा आदेश बिलासपूर उच्च न्यायालयाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाशी संबंधित आहे. दोन्ही प्रकरणांची सुनावणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जोगी यांना आत्मसमर्पणातून सूट दिली. तसेच सीबीआयला प्रतिसाद मागण्यासाठी नोटीस बजावली.
आता चेंडू सीबीआयच्या कोर्टात असून पुढील सुनावणीत प्रकरणाची दिशा ठरवली जाईल. आपल्या अलीकडील निकालात, छत्तीसगड उच्च न्यायालयाने अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांना गुन्हेगारी कट आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. यापूर्वी 2007 मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती, तर इतर 28 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) तत्कालीन नेते राम अवतार जग्गी यांची 4 जून 2003 रोजी रायपूरमधील मौदाहापारा पोलीस ठाण्याजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अमित जोगी आणि इतर 29 जण आरोपी होते. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला जोगी यांची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु नंतर छत्तीसगड उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अमित जोगी यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. या दिलासामुळे जोगी यांची अटक आणि शिक्षेची प्रक्रिया थांबली आहे.
Comments are closed.