छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, थेट उपमहापौरांच्या विरोधताच आंदोलन
छत्रपती संभाजीनगर शिवसेना न्यूज : साताऱ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना शिंदे गटातील वाद उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्वीकृत नगरसेवक पदावरुन वाद झाला आहे. इच्छुक पदाधिकाऱ्यांनी थेट उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधातच जोडो मारो आंदोलन सुरु केलं आहे. क्रांती चौकात काही इच्छुकांनी एकत्र येत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन
छत्रपती संभाजी नगरच्या शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकावरून बेबनाव पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिंदे सेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. दुसरीकडे या निवडी विरोधात क्रांती चौकात काही इच्छुक रस्त्यावर उतरले. या निवडीवर नाराजी व्यक्त करत इच्छुक पदाधिकारी विनोद बनकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. क्रांती चौकात विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले. यावेळी जंजाळ यांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी निवड प्रक्रियेत भेदभाव झाल्याचा आरोप केला. तसेच जंजाळ हे जातीवादी वागणूक देत असल्याची टीकाही त्यांनी केली. या आंदोलनामुळे शिंदे गटात अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली असून, आगामी काळात या वादाला काय वळण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यात तीव्र मतभेद
साताऱ्यात शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यातील मतभेद तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडील सभांमधील बॅनर वाद आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून हा संघर्ष अधिकच चिघळला असून, दोन्ही नेते आमने-सामने आल्याचे स्पष्ट झाले आहे. शंभूराज देसाई हे आपल्याला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात, कोणत्याही कार्यक्रमांना आपल्याला बोलावलं जात नाही, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपणास कार्यक्रमासाठी बोलावले नाही, फोनही आलेला नाही, असा दावा महेश शिंदे यांनी केला आहे. त्यावर शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असं आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असं म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल असं मत मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केलं. पक्षात कुणालाही डावलण्याचा प्रयत्न केला जात नाही, असं म्हणत त्यांनी महेश शिंदेंना प्रत्युत्तरही दिलं.
आणखी वाचा
Comments are closed.