केनियात मुलींच्या शाळेत भीषण आग, 16 विद्यार्थिनींचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केनियातील नाकुरू काउंटीमधील गिलगिल येथील उतुमिषी गर्ल्स अकादमीच्या वसतिगृहात गुरुवारी पहाटे 3.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 16 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर 74 हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आगीची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका पथके घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. आगीत सुरुवातीला 10 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली होती. मात्र उपचारादरम्यान गंभीर भाजलेल्या आणखी सहा विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अनेक विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सेंट जोसेफ रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत.

ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. आगीच्या कारणाबाबत तपास सुरू आहे. सध्या बचावकार्य, जखमींवर उपचार आणि पीडित कुटुंबांना मदत करणे याला प्राधान्य दिले जात आहे. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख आणि पीडितांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे.

Comments are closed.