जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणा
बुलढाणा पोलीस प्रकरण : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी ज्या विवाहित मुलीची हत्या झाल्याचा दावा केला होता, आणि त्या प्रकरणात तिच्या वडील आणि भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं होतं, ती मुलगी प्रत्यक्षात जिवंत निघाली. मृत घोषित केलेली ही मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं बुलढाणा पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली असून त्यांच्या निष्काळजीपणाचा नमुना चव्हाट्यावर आला आहे.
जवळपास 20 दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. अत्यंत क्रूरपणे केलेल्या या हत्येमध्ये मृतदेहापासून काही फुटांवर त्या महिलेचे शिर कापून फेकलेले होते. या घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक विभागाच्या टीमला पाचारण करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.
जळगाव जामोद पोलिसांचा दावा : पोलिस कॅमेऱ्याचा अजब दावा
या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी विशेष मार्गदर्शन केलं होतं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा छडा लावल्याचा मोठा दावा केला. मध्य प्रदेशातील एका गावातील शिवानी बापूराव कळमेकर असं या मृत मुलीचे नाव असल्याची ओळख पोलिसांनी पटवली. शिवानी विवाहित असूनही तिचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांना कंटाळून तिच्या वडिलांनी आणि भावानेच तिची हत्या केली, आणि मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरण परिसरात आणून टाकला, असा दावा पोलिसांनी केला होता.
Shivani Kalmekar Alive : मुलगी थेट पोलीस ठाण्यात हजर
या कथित हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. शिवानीचे वडील बापूराव कळमेकर आणि तिच्या भावाला बेड्या ठोकून त्यांची रवानगी बुलढाणा कारागृहात करण्यात आली. मात्र, या कथेत एक मोठा ट्विस्ट आला. मृत घोषित केलेली शिवानी कळमेकर ही प्रत्यक्षात जिवंत असून तिने तिच्या प्रियकरासोबत मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठलं. तिथे तिने ‘मी जिवंत आहे आणि माझ्या कथित हत्येच्या खोट्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना आणि भावाला जळगाव जामोद पोलिसांनी जेलमध्ये टाकलं आहे,’ असा धक्कादायक कबुलीजबाब दिला.
Police DNA Testing Negligence : डीएनए चाचणी न करताच कारवाई
बुऱ्हानपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर, शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाली आहे. तिला जिवंत पाहून पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. सर्वात मोठी बाब म्हणजे, राजुरा धरणावर आढळलेल्या त्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची कोणतीही शास्त्रीय डीएनए (DNA) तपासणी न करताच पोलिसांनी थेट शिवानीच्या वडिलांना आणि भावाला खुनाचा आरोपी बनवले. पोलिसांच्या या घाईगडबडीमुळे आणि ढिसाळ कारभारामुळे एका जिवंत मुलीच्या हत्येप्रकरणी तिचे निष्पाप कुटुंब जेलमध्ये गेल्याची घटना घडली.
शिवानीचे काका नारायण कळमेकर म्हणाले की, “माझी पुतणी शिवानी ही बेपत्ता होती आणि तशी तक्रार आम्ही बुऱ्हानपूर जिल्ह्यातील खगनार पोलीस स्टेशनला दिली होती. एक दिवस बुलढाणा पोलीस आमच्या घरी आले. त्यांनी माझे भाऊ बापूराव कळमेकर आणि पुतण्या यांना उचलून खगणार पोलीस स्टेशनला नेले. तुम्ही तुमच्या मुलीचा खून केला आहे आहे असा आरोप तुम्हाला आम्ही अटक करत आहोत असं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी त्यांना खूप मारहाण करून त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. माझा भाऊ आणि पुतण्या निर्दोष असून शिवानी जिवंत आहे.”
Buldhana Crime : मग ‘तो’ मृतदेह कोणाचा?
शिवानी जिवंत समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासनासमोर एक अत्यंत गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरा धरण परिसरात सापडलेला आणि अर्धवट जळालेला ‘तो’ मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा होता? तिची हत्या कोणी आणि का केली? हे गुढ आता अधिकच वाढलं आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणावर आणि स्वतःच्या अजब निष्काळजीपणावर बुलढाणा पोलीस सध्या तरी काहीही बोलण्यास तयार नसून त्यांनी मौन बाळगणे पसंत केलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.