मुंबईच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; BCCIची पहिली प्रतिक्रिया
IPL 2026 ब्रॉडकास्ट इंजिनिअरचे निधन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयन विल्यम लँगफोर्ड (Ian Williams Langford) यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. लँगफोर्ड हे आयपीएलच्या ब्रॉडकास्ट टीमचा महत्त्वाचा भाग होते. 30 मार्च रोजी सकाळी ते मुंबईतील हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरचं निधन, बीसीसीआयने काय म्हटलं? (BCCI Statement Broadcast Engineer Passes Away)
बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि सर्व संबंधित घटक समर्पित ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयन विल्यम लँगफोर्ड यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करतात. ते आमच्या ब्रॉडकास्ट ऑपरेशन्सचा अविभाज्य भाग होते. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो.”
पडद्यामागे काम करणाऱ्या सहकाऱ्यांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत बीसीसीआयने पुढे म्हटले आहे की, “या कठीण काळात लँगफोर्ड यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत देण्यास आयपीएल कटिबद्ध आहे. स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राधान्ये आहेत.”
नेमकं काय घडलं? (BCCI brand cast engineer death)
76 वर्षीय ब्रिटिश नागरिक लँगफोर्ड आयपीएलच्या ब्रॉडकास्ट कामासाठी मुंबईत आले होते. ते 24 मार्चपासून ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. 29 मार्चच्या रात्री सामना संपल्यानंतर ते आपल्या खोलीत परतले होते. मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या माहितीनुसार, 30 मार्चच्या सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले. हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अजून तरी संशयास्पद बाब आढळलेली नाही… (IPL 2026 Broadcast Engineer Passes Away )
प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालातही काहीही संशयास्पद निष्पन्न झालेले नाही. तरीही, खबरदारी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, 28 मार्चपासून आयपीएल 2026 हंगामाची सुरुवात झाली असून आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. मंगळवारी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात न्यू चंदीगड स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.