IPL 2026 – नूर अहमदच्या घातक गोलंदाजी मागे धोनीचा कानमंत्र, KKR चा पराभव केल्यानंतर प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची माहिती
IPL 2026 च्या हंगामाची खराब सुरुवात करणाऱ्या चेन्नईचा संघ अखेर विजयी ट्रॅकवर आला आहे. मंगळवारी (14 एप्रिल 2026) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईने आयपीएलमधला दुसरा विजय साजरा केला. या विजयाचा हिरो ठरला अफगाण फिरकीपटू नूर अहमद. नूर अहमद फॉर्मात आला अन् त्याने KKR विरुद्ध 4 षटकांत 21 धावा देत 3 विकेट घेतल्या. नूरच्या या पुनरागमनामागे चेन्नईचा आयकॉन एमएस धोनीचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. सराव सत्रादरम्यान धोनीने नूरशी प्रदीर्घ चर्चा करून त्याला काही मोलाचे सल्ले दिले होते, ज्याचा सकारात्मक परिणाम मैदानात दिसून आला.
चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी सामन्यानंतर TOI शी बोलताना सांगितले की, धोनीने नूरला विशेषतः ‘लेग-ब्रेक’ चेंडूंवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. या हंगामातील इतर खेळपट्ट्यांच्या तुलनेत कोलकाताविरुद्धची खेळपट्टी थोडी संथ होती, ज्याचा नूरने अचूक फायदा घेतला. हवेतील वेग कमी करून चेंडूला अधिक साईड स्पिन आणि ड्रॉप मिळवण्यावर त्याने काम केले. सुरुवातीच्या काही सामन्यांत नूरला खेळपट्ट्यांच्या स्वरूपामुळे यश मिळाले नव्हते, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने त्याने फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले.
IPL 2026 चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर खेळवल्या, अजिंक्य रहाणेला 12 लाखांचा दंड
प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी नूरचे कौतुक करताना त्याला खेळाचा एक उत्तम विद्यार्थी म्हटले आहे. नूर सामन्यापूर्वी फलंदाजांचा सखोल अभ्यास करतो आणि त्यानुसार आपली रणनीती व क्षेत्ररक्षण ठरवतो. अकील हुसेनने मोक्याच्या क्षणी दिलेल्या सूचना आणि धोनीचा अनुभव यांमुळे नूरच्या गोलंदाजीत धार आली आहे. चेंडू उशिरा वळवणे ही त्याची ताकद असून, आगामी सामन्यांमध्येही तो चेन्नईसाठी अशीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
Comments are closed.