ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा 2026: युवा पलटन, मध्य रेल्वे यांची विजयी सलामी

युवा पलटन, मध्य रेल्वे आणि एचएएल नाशिक यांनी ओम ज्ञानदीप मंडळाने आयोजित केलेल्या या हंगामातील पहिल्या पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबई, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅट वर झालेल्या अ गटातील पहिल्या साखळी सामन्यात युवा पलटनने स्वामी समर्थ स्पोर्टस् चा ५७-२६ असा सहज पराभव केला.

समोरच्या टिमचा अंदाज घेत खेळ करणाऱ्या युवा पलटनने विश्रांतीला २७-१६ अशी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर मात्र टॉप गिअर वर पाय ठेवत सामना २९ गुणांच्या फरकाने खिशात टाकला. अभिषेक गुंगे, अस्लम इनामदार आणि वैभव दाभाडे या विजयाचे शिल्पकार ठरले. स्वामी समर्थच्या अलताब मानसूख आणि प्रशांत पवार यांनी बऱ्यापैकी लढत दिली.

मध्य रेल्वेने क गटात रूपाली ज्वेलर्सचा ४६-१७ असा पाडाव केला. पूर्वार्धात आक्रमक खेळ करीत २७-१७ अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीकांत जाधव, विनोद अत्याळकर यांच्या सुरवातीच्या आक्रमक खेळाला या विजयाचे श्रेय जाते. रूपालीच्या किशोर भोसले, गणेश मांजो यांचा खेळ आज सुमार होता.

नाशिकच्या एचएएलने इ गटात जेजे रुग्णालयवर ४३-३१ असा विजय मिळविला. पहिल्या डावात दोन्ही संघाने १-१ लोण दिल्याने मध्यंताराला १८-१८ असा गुणफलक होता. दुसऱ्या डावात मात्र नाशिककरांनी तुफानी खेळ करीत विरुद्ध संघावर २ लोण दिले आणि सामना १२ गुणांनी आपल्या बाजूने झुकविला.

पवन भोर, साहिल बिले, भूषण सानप यांचा उत्तरार्धातील तुफानी खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. जेजेच्या युवराज गवारे, आशिष वाघ यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर, मुंबई शहर संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

इतर संक्षिप्त निकाल-
१) भारत पेट्रोलियम युनिव्हर्सिटी न्यू इंडिया (३९-२७).
२) सी.जी. S. T. V.V. न्यू इंडिया (३१-१९).
(दोन्ही सामने ब गटातील)

Comments are closed.