IPL 2026 – केएल राहुल कोपला, गोलंदाजांना घाम फुटला; अशी कामगिरी करणारा पहिलाच हिंदुस्थानी फलंदाज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने फलंदाजीचा नवा इतिहास रचला आहे. पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना राहुलने नाबाद 152 धावांची तुफानी खेळी साकारली. यासह आयपीएलमध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. राहुलची ही खेळी ख्रिस गेल (175) आणि ब्रेंडन मॅक्युलम (158) यांच्यानंतर आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. सुरुवातीला दोन जीवदानं मिळाल्यानंतर राहुलने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला.

या सामन्यात राहुलला नितीश राणाची मोलाची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 220 धावांची विक्रमी भागीदारी केली. आयपीएल इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी 2016 मध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी 229 धावांची भागीदारी केली होती. राहुल आणि राणा यांनी अवघ्या 96 चेंडूत ही धावसंख्या उभी करत दिल्ली कॅपिटल्सच्या इतिहासातील 2012 चा डेव्हिड वॉर्नर आणि नमन ओझा (189 धावा) यांचा विक्रम मोडीत काढला.

राहुलने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 9 उत्तुंग षटकार लगावत आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतकही पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूला नितीश राणाने 91 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत 2 बाद 264 धावांचा डोंगर उभा केला. या खेळीसह राहुलने ऋषभ पंतचा (128*) दिल्लीसाठीचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही स्वतःच्या नावावर केला आहे. आता पंजाब समोर विजयासाठी 265 धावांचे कठीण आव्हान आहे.

Comments are closed.