फिन ऍलनने टी20 मध्ये रचला इतिहास! न्यूझीलंडकडून 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

आयपीएल २०२६ मध्ये शुक्रवारी (८ मे) अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. यामध्ये केकेआरच्या फिन ऍलनचे वादळ आले. त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीतील सर्वात धमाकेदार खेळींपैकी एक खेळी सादर केली. १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडच्या या फलंदाजाने ५ चौकार आणि १० षटकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूंत नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे केकेआरने १४.२ षटकांतच लक्ष्य गाठले.

या खेळीसह ऍलनने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. तो एका कॅलेंडर वर्षात तीन टी२० शतके झळकावणारा न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

ऍलनने या वर्षाच्या सुरूवातीला बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्ससाठी शतकी खेळी होती. तसेच त्याने टी२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील उपांत्या फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले होते. ३३ चेंडूंतील ही खेळी वनडे आणि टी२० विश्वचषकांच्या एकत्रित इतिहासातील सर्वात वेगवान शतकी खेळी ठरली.

ऍलन हा ब्रेंडन मॅक्युलमनंतर आयपीएलमध्ये शतक करणारा दुसराच न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर तो केकेआरसाठी शतकी खेळी करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी मॅक्युलम, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेन यांनी शतके केली आहेत.

सामन्यात काय घडले हे पाहिले तर केकेआरच्या गोलंदाजांनी कठीण खेळपट्टीवर उत्तम कामगिरी केली आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचा प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय योग्य ठरवला. डीसीकडून पथुम निसांकाने २९ चेंडूंत ५० धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली, मात्र मधल्या षटकांमध्ये त्यांच्या धावांची गती संथ झाली. नरेन, अनुकूल रॉय आणि कार्तिक या फिरकीपटूंनी धावा रोखून धरल्या. तसेच नियमिचपणे विकेट्सही घेतल्या.

डीसीने २० षटकांत ८ विकेट्स गमावत केवळ १४२ धावा केल्या. निसांकानंतर आशुतोष शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २८ चेंडूंत तीन चौकार आणि तेवढेच षटकार मारत ३९ धावा केल्या. प्रत्त्युत्तरात केकेआरने सुरूवातीलाच दोन विकेट्स गमावल्या, मात्र ऍलनच्या खेळीने त्यांचा डाव सोपा झाला. तो वरुण चक्रवर्तीच्या जागी इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून खेळला.

ऍलनसाठी यंदाचे वर्ष टी२० फॉरमॅटमध्ये उत्तम ठरत आहे. त्याने या हंगामात आतपर्यंत जवळपास १९५ च्या स्ट्राईक रेटने ९०५ धावा केल्या आहेत.

Comments are closed.