केकेआरच्या विजयामुळे आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीत चुरस! दिल्ली कॅपिटल्ससह तीन संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ मध्ये विजयाचा धडाका लावला आहे. शुक्रवारी (८ मे) त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्यात घरात पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरचा हा सलग चौथा विजय ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १० पैकी ५ सामने गमावले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरीकडे डीसीचा हा सातवा पराभव ठरला असून त्यांच्यासह चार संघ जवळपास आयपीएलच्या १९ व्या हंगामाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
गुणतालिकेत पाहिले तर सनरायझर्स हैद्राबाद पहिल्या स्थानावर असून त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकत १४ पॉइंट्स मिळवले आहेत. प्लेऑफला पात्र होण्यासाठी संघांना कमीत कमी १६ पॉइंट्सची आवश्यकता असते आणि एसआरएचचे तीन सामने बाकी असून त्यामधील केवळ एक सामना जिंकला की त्यांची प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल. २०१६ च्या विजेत्या संघाची नजर प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याबरोबर पहिल्या दोनमध्ये जागा पक्की करण्यावर आहे, ज्यामुळे ते क्वालिफायर-१ खेळू शकतील.
दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्ज असून त्यांनी हंगामाची सुरूवात तर चांगली केली होती, मात्र मागील तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी आतापर्यंत १० सामने खेळताना ६ जिंकले, ३ गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे त्यांचे १३ पॉइंट्स आहेत. त्यांना प्लेऑफसाठी पात्र होण्यास त्यांच्या पुढील ४ पैकी किमान २ सामने जिंकावे लागतील.
पंजाबप्रमाणे गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदेखील भरकटली आहे. त्यांनी मागील दोन्ही सामने गमावले आहेत, मात्र त्यांच्याकडे प्लेऑफसाठी पात्र होण्यास अधिक संधी आहे. त्यांनी १० पैकी ६ सामने जिंकले असून त्यांचे १२ पॉइंट्स झाले आहेत. यामुळे त्यांनाही उर्वरित ४ पैकी २ सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यांचे हे चार सामने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्याविरुद्ध आहेत.
बंगळुरूप्रमाणे राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचेही १२ पॉइंट्स आहेत.
यांमधील गुजरात आणि राजस्थानने १० पैकी ६ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांना उर्वरित ४ पैकी २ सामने जिंकत प्लेऑफची फेरी गाठण्याची संधी आहे. कोलकाता आणि चेन्नईचे उर्वरित सामने पाहिले तर दोघांनाही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. गुजरातने १० पैकी ४ सामने तर चेन्नईने ५ सामने गमावले आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांना बाकी राहिलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत अधिकाधिक सामने जिकांवे लागतील.
दिल्लीसोबत पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स जवळपास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. तिन्ही संघांनी ७ सामने गमावले आहेत. त्यांनी त्यांचे बाकी राहिलेले सर्व सामने जिंकले, तर केवळ १४ पॉइंट्स मिळू शकतात. स्पर्धा ज्याप्रकारे चालली आहे त्यावरून १४ पॉइंट्ससह हे प्लेऑफसाठी पात्र होण्यास कठीण आहेत.
Comments are closed.