IPL 2026 – ऍलन वादळात दिल्ली गुल, प्ले ऑफच्या शर्यतीसाठी केकेआरचीही धावाधाव
आधी दिल्लीची बत्ती 142 धावांत गुल करणाऱ्या कोलकात्याला फिन ऍलनच्या शतकी वादळाने 34 चेंडू आणि 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. या जोरदार विजयामुळे कोलकात्याच्या प्ले ऑफच्या शर्यतीसाठी जोरदार धावाधाव सुरू झाली आहे. आता ते 9 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून त्यांनी पुढील चारही सामने जिंकले तर ते अव्वल चारमध्येही पोहोचू शकतात. मात्र या पराभवामुळे दिल्लीचे प्ले ऑफ स्वप्न अंधुक झाले आहे.
दिल्लीला 142 धावांत रोखल्यामुळे कोलकात्याने अर्धी लढाई जिंकली होती. अजिंक्य रहाणे (13) सलग नवव्या सामन्यांतही पन्नाशी गाठू शकला नाही. तो धावबाद झाला आणि मग अंगकृष रघुवंशीही एका धावेवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फिन ऍलन आणि कॅमरून ग्रीनला आरामात धावांचा पाठलाग सुरू केला. 10 षटकांत कोलकात्याने 75 धावा केल्या होत्या. 32 चेंडूंत अर्धशतक साजरे करणाऱ्या ऍलनने 11 व्या षटकापासून अशी षटकारबाजी सुरू केली की, त्याने पुढील 15 चेंडूंत 7 षटकार खेचत 49 धावा ठोकल्या आणि आपले पहिलेवहिले आयपीएल शतकही साजरे केले. त्याने 47 चेंडूंत 10 षटकार आणि 5 चौकार खेचत शंभरी गाठली. त्याच्या झंझावातामुळे कोलकात्याने 15 व्या षटकात विजय मिळवला.
त्याआधी पथुम निसांका (50) आणि के. एल. राहुल (23) यांनी 49 धावांची खणखणीत सलामी दिली, पण ही जोडी फुटल्यानंतर अचानकपणे दिल्लीची मधली फळी अक्षरशः कोलमडली. त्याआधी नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्ज आणि अक्षर पटेल या चौघांनीही घोर निराशा केल्यामुळे 89 धावांत दिल्लीचा अर्धा संघ गारद झाला होता. मात्र त्यानंतर आशुतोष शर्माने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवला आणि संघाला 142 पर्यंत पोहोचवले. आशुतोषने 3 षटकार आणि 3 चौकार खेचत 39 धावा ठोकल्या.
Comments are closed.