IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
आयपीएल 2026 मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (Rohit Sharma)… क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)… मग तिलक वर्मा (Tilak Verma)… चौथ्या नंबरवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). पाचव्या नंबरवर स्वत: कॅप्टन हार्दिक पंड्या (Hardik Pandya). याच टीममध्ये नमन धीर, विल जॅक, खाली मिचेल सँटनर, शार्दूल ठाकूर… बॉलिंग लाईनअपमध्ये ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा हे जगातले अव्वल गोलंदाज. इम्पॅक्ट प्लेयर रुदरफोर्ड. काय टीम आहे. यंदाच्या आयपीएलमधली सर्वात स्ट्राँग टीम कोणती असेल तर ती आहे मुंबई इंडियन्स. आणि म्हणूनच या टीमसमोर कुणाचा टिकाव लागणार का? हाच प्रश्न पडतो.
2020 साली दिल्लीला हरवून मुंबई इंडियन्सनं आयपीएलची ट्रॉफी पाचव्यांदा उंचावली. पण गेले पाच सीझन मुंबई सहाव्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. खरं तर 2013 साली मुंबईनं सहाव्या आयपीएल मोसमात पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली. पण त्यानंतर दर दोन वर्षांनी ही ट्रॉफी मुंबईत यायची. मात्र त्यानंतर 2013 नंतर पहिल्यांदा असं असेल की मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांना ट्रॉफीसाठी इतकी वाट बघावी लागतेय. पण यंदाची टीम पाहता पलटनची ही प्रतीक्षा संपेल अशी आशा निर्माण झाली आहे.
भारतानं नुकताच ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकला. या विश्वविजेत्या संघातले तब्बल चार हुकमी एक्के मुंबईच्या संघात आहेत. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव… 2024 आणि 2026 च्या टी20 विश्वचषक विजयात अष्टपैलू कामगिरी बजावणारा हार्दिक पंड्या… मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज तिलक वर्मा आणि जगातला सध्याच्या घडीचा सर्वोत्तम टी20 गोलंदाज जसप्रीत बुमरा. या चारही जणांमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे.

मुंबई इंडियन्सची आणखी एक महत्वाची जमेची बाजू म्हणजे या फ्रँचायझीला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्मा. गेले दोन सीझन रोहित नेतृत्व करत नसला तरी सलामीवीराची जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडतोय. त्याला यंदा साथ मिळेल ती अनुभवी क्विंटन डी कॉकची. ही जोडी यंदाच्या आयपीएल सीझनमधली सर्वात स्फोटक सलामी ठरू शकते. मधल्या फळीत सूर्यकुमार, तिलक आणि स्वत: हार्दिक पंड्या असल्यानं समोरच्या टीमवर यावेळी मुंबईविरूद्ध खेळताना प्रचंड मोठा दबाव असले. त्यात मुंबईची फलंदाजी मिचेल सँटनर आणि शार्दूल ठाकूरच्या संघात येण्यानं ९ नंबरपर्यंत आहे. त्यामुळे या सीझनमध्ये मुंबईची पलटन फलंदाजीत काय कमाल करतेय याची उत्सुकता राहील.
प्रचंड अनुभव आणि आक्रमकता याचं परफेक्ट कॉम्बिनेशन यंदा मुंबई इंडियन्सच्या बाबतीत जुळून आलंय. महत्त्वाचे सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे प्ले ऑफमधला मुंबईचा प्रवेश सीझनच्या सुरुवातीआधीच ही कागदावरची टीम पाहून पक्का मानला जातोय. आता प्रतीक्षा आहे ती धडाकेबाज परफॉर्मन्सची. मुंबईनं लौकिकास साजेसा खेळ करण्याची. आणि सहा वर्षांपासूनची जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची. ऑल द बेस्ट पलटन!
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2026 CSK : ‘डॅडीज आर्मी’ ते यंग ब्रिगेड… आयपीएलचा नवा सीझन आणि नवी चेन्नई सुपर किंग्स!
आणखी वाचा
Comments are closed.