निकोलस पूरनची निवड सुपर ओव्हरसाठी अयोग्यच! आकडेवारीच थक्क करणारी, पंतचा निर्णय पूर्णपणे चुकला?

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सकडून लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला. यामुळे पुन्हा एकदा एलएसजीचा फलंदाज निकोलस पूरनच्या कामगिरीकडे लक्ष गेले आहे. त्याला सुपर ओव्हरमध्ये का पाठवले गेले, यावर चर्चा सुरू झाली. त्यामागचे कारण म्हणजे त्याची सुपर ओव्हरमधील सुमार कामगिरी.

पूरनची सुपर ओव्हर आणि त्यात सुनील नरेनसमोरची कामगिरी निराशाजनक आहे. टी२० च्या सुपर ओव्हरमध्ये त्याने ० (५), ० (१), ० (१), १ (२) आणि ०(१) अशा धावा केल्या आहेत. यावरून त्याने १० चेंडूंमध्ये केवळ एक धाव केली असून तीनदा त्याने विकेट गमावली आहे. यामुळे त्याला दबावाच्यावेळी पुन्हा एकदा फलंदाजीसाठी पाठवण्याच्या एलएसजीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केकेआरने प्रथम फलंदाजी करताना एलएसजीला १५६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात एलएसजीकडून २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ७ धावांची आवश्यकता असताना मोहम्मद शमीने षटकार मारला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एलएसजीने पूरनसोबत एडन मार्करमला पाठवले, मात्र त्यांचा हा निर्णय चुकला. सुनील नरेनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर पूरन बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर मार्करमही बाद झाला. यामुळे एलएसजीने सुपर ओव्हरमध्ये केवळ एकच धाव केली. केकेआरने दोन धावांचे लक्ष्य केवळ एका चेंडूतच गाठले. रिंकू सिंगने चौकार मारत संघाचा विजय निश्चित केला.

यामुळे पूरनच्या कामगिरीबाबत चर्चा सुरू झाली, मात्र कर्णधार रिषभ पंतने वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक पाठिंब्याला महत्त्व देत या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, “मी चर्चा केली आणि त्यात निकोलस पूरनचे नाव समोर आले. तो सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही, मात्र कठिण परिस्थितीत तुम्ही तुमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवाल.”

केकेआरविरुद्ध पूरनला प्रथम फलंदाजीवेळी खाते उघडण्यासाठी पाच चेंडूंचा सामना करावा लागला. तसेच तो १२ चेंडूत ९ धावा करत बाद झाला. या हंगामात त्याचा फॉर्मही वाईट असून तरीही त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले गेले, असा प्रश्न निर्माण होतो.

Comments are closed.