आरसीबीचा एक विजय अन् MI, LSG, KKR हादरलं; प्लेऑफच्या गणितात मोठा उलटफेर, जाणून घ्या समीकरण
आयपीएल 2026 गुण सारणी : आयपीएल 2026 मधील 34वा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला गेला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत आरसीबीने माजी कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरातवर शानदार विजय मिळवला. या विजयासह आरसीबी पुन्हा टॉप-2 मध्ये पोहोचली, तर गुजरातची अवस्था आणखी बिकट झाली आहे.
आरसीबीचा दमदार पाठलाग
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 3 गडी गमावत 205 धावा केल्या. प्रत्युत्तर आरसीबीने 18.5 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठत सामना आपल्या नावावर केला. या मोसमातील आरसीबीचा हा पाचवा विजय ठरला. या विजयामुळे ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेपावले, तर सलग दुसरा पराभव पत्करल्याने जीटी सातव्या स्थानावर घसरले.
पंजाब अजूनही अव्वल
पंजाब किंग्स (PBKS) सहा सामन्यांत पाच विजयांसह 11 गुण मिळवून अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांचा नेट रनरेट +1.420 इतका प्रभावी आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स (RR) असून त्यांनी सात सामन्यांत पाच विजयांसह 10 गुण मिळवले आहेत (+0.790 NRR). आरसीबी देखील 7 सामन्यांत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
टॉप-4 मध्ये हैदराबाद
चौथ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद (SRH) असून त्यांचे 8 गुण आहेत (+0.820 NRR). प्लेऑफच्या शर्यतीत आता प्रत्येक सामना आणि नेट रनरेट निर्णायक ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) 6 गुणांसह सहाव्या स्थानी, GT 6 गुणांसह सातव्या स्थानी, मुंबई इंडियन्स (MI) 4 गुणांसह आठव्या स्थानी, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) 4 गुणांसह नवव्या स्थानी, तर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) 3 गुणांसह दहाव्या स्थानी आहेत. समान गुण असूनही नेट रनरेटमुळे क्रमवारीत फरक दिसून येतो.
मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कसे पोहोचतील? (MI IPL 2026 Playoff Scenarios)
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला त्यांचे सर्व सात किंवा किमान सहा सामने जिंकावे लागतील. मात्र, जर ते एकापेक्षा जास्त सामने हरले, तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. मुंबईने या हंगामातील आपला अर्धा प्रवास पूर्ण केला आहे. आता त्यांना आणखी सात सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी आपले सर्व सामने जिंकले, तर त्यांचे 18 गुण होतील, ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत होऊ शकते. मात्र, जर ते दोन किंवा अधिक सामने हरले, तर त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल.
कोहलीकडे ऑरेंज कॅप
GT विरुद्ध 44 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या कामगिरीसह कोहलीने ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली आहे. 7 सामन्यांत त्याच्या 328 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्मा (323 धावा) दुसऱ्या, तर हेनरिक क्लासेन (320 धावा) तिसऱ्या स्थानावर आहेत.
पर्पल कॅप कंबोजकडे
गोलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज 7 सामन्यांत 14 विकेट्ससह पर्पल कॅपवर कब्जा ठेवून आहे. प्रिन्स यादव (13 विकेट्स) दुसऱ्या, तर ईशान मलिंगा (12 विकेट्स) तिसऱ्या स्थानावर आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.