IPL 2026 जयपूर नव्हे बदलापूर, हैदराबादविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजस्थान उत्सुक

क्रिकेटमध्ये बदला हा शब्द फार मोठा असतो आणि तो घेताना संघ फक्त खेळत नाही, तर तो लढतो. शनिवारी जयपूरच्या मैदानावर अशीच एक सुडाची ठिणगी भडकणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत आणि या वेळी राजस्थानच्या डोळय़ांत फक्त विजय नाही, तर 57 धावांच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची ज्वाला धगधगतेय.

मागील सामन्यात हैदराबादने राजस्थानला अक्षरशः तिन्ही टप्प्यांत चिरडले होते. पॉवर प्लेमध्ये राजस्थानचा पाया हादरवला. मग मधल्या षटकांत त्यांच्या फलंदाजीचा गळा आवळला आणि डेथ ओव्हर्समध्ये शेवटचा घाव घातला. त्या पराभवाची जखम अजून ताजी आहे आणि म्हणूनच यावेळी घरच्या मैदानावर राजस्थान ‘बदलापूर’मध्ये उतरणार, हे नक्की.

प्ले ऑफच्या रेसमध्ये हा सामना ‘सहा गुणांचा’ ठरू शकतो. जिंकणारा संघ टॉप-4 मध्ये आपली पकड मजबूत करेल, तर हरलेल्यासाठी दबाव वाढणार म्हणजेच सामना केवळ दोन गुणांचा नाही, तर प्रतिष्ठsचा आणि भविष्याचा आहे.

हैदराबादची ताकद म्हणजे त्यांची स्पह्टक सुरुवात. ईशान किशन, ट्रव्हिस हेड आणि हेन्रीक क्लासन हे त्रिकूट पॉवर प्लेचं रणांगण बनवते. त्यात अभिषेक शर्माने नुकतेच शतक झळकावत आपला ‘फॉर्म मीटर’ रेड झोनमध्ये नेलाय. राजस्थानच्या गोलंदाजांसाठी ही परीक्षा असेल आणि तीही कठीण.

मात्र हैदराबादची गोलंदाजी अजून ‘कच्च्या विटां’वर उभी आहे. प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन यांनी मागील सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेत राजस्थानचा कणा मोडला होता, पण अनुभवाच्या बाबतीत अजूनही ही फळी थोडी नाजूक वाटते. त्यात कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीने संघाला थोडा धक्का बसलाय. तरी अलीकडील सामन्यांत त्यांनी सुधारलेली कामगिरी दाखवून विरोधकांना सावध केलं आहे.

आता सर्वांच्या नजरा एका खास द्वंद्वावर खिळल्या आहेत त्या म्हणजे वैभव सूर्यवंशी विरुद्ध प्रफुल हिंगे. गेल्या सामन्यात हिंगेने सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर परत पाठवलं होतं आणि त्यामागे ‘प्लॅन’ असल्याचंही जाहीर केलं होतं. त्यामुळे यावेळी सूर्यवंशीच्या बॅटमध्ये केवळ रन नाहीत, तर ‘रिव्हेंज’चा बारुदही असेल!

राजस्थानकडे पाहिलं तर हा संघ जवळपास संतुलित आहे. सात सामन्यांत पाच विजय. हा आकडा त्यांच्या आत्मविश्वासाची साक्ष देतो. यशस्वी जैसवालने 245 धावांसह स्थिरतेला आक्रमकतेची जोड दिली आहे. तर युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी 254 धावांसह संघाचा ‘रन मशीन’ ठरला आहे आणि त्याचा 220 पेक्षा अधिक धावांचा स्ट्राईक रेट म्हणजे विरोधकांसाठी धोक्याची घंटा. ध्रुव जुरेलनेही त्याला मोलाची साथ दिली आहे. मात्र कर्णधार रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांची बॅट अजून ‘स्लीप मोड’मध्ये आहे. जर बॅट त्या जाग्या झाल्या तर हैदराबादसाठी ही रात्र लांबणार.

गोलंदाजीत जोफ्रा आर्चर 11 विकेट्ससह आघाडीवर आहे. तिक्षणा, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा त्याला चांगली साथ देत आहेत. मागील सामन्यात हसरंगा आणि जाडेजाने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजयाची दिशा दिली होती. हीच त्यांची खरी ताकद आहे.

Comments are closed.