IPL 2026 – लहाणपणीच आईचं छत्र हरवलं, काकांचा त्याग अन् हैदराबादच्या अनिकेत वर्माचा धमाका; वाचा त्याचा संघर्षमय प्रवास…
IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे आरसीबीने विक्रमी विजय नोंदवला असला, तरी सध्या सर्वत्र चर्चा होत आहे ती हैदराबादच्या अनिकेत वर्माची. झाशीच्या या 24 वर्षीय युवा खेळाडूने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ 18 चेंडूंमध्ये 43 धावांची वादळी खेळी केली. आपल्या खेळीत त्याने चार गगनचुंबी षटकार खेचत सामन्याचे चित्र पालटले आणि रातोरात तो इंटरनेट सेन्सेशन बनला.
अनिकेतचा आयपीएलपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे. अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याने आपल्या आईला गमावले, त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केल्याने अनिकेत एकाकी पडला होता. अशा कठीण काळात त्याचे काका अमित वर्मा यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. झाशीसारख्या छोट्या शहरात आर्थिक चणचण आणि सुविधांचा अभाव असतानाही, काकांनी स्वतः कष्ट करून अनिकेतला क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न पाहिले. अनिकेत तासनतास मैदानात सराव केला, घाम गाळला जेणेकरून तो घरातील एकाकीपण विसरू शकेल. त्याच्या या जिद्दीला भोपाळमधील प्रशिक्षक नंदजीत यांचीही मोलाची साथ लाभली.
मैदानावर निडरपणे खेळणाऱ्या अनिकेतला आज हिंदुस्थान क्रिकेटचा नवा ‘फिनिशर’ म्हणून पाहिले जात आहे. आईचे छत्र हरवल्यानंतर आणि कौटुंबिक चढ-उतारांनंतरही त्याने हार मानली नाही. आरसीबीविरुद्धच्या त्या एका खेळीने त्याचे नशीब बदलले असून, त्याच्या यशात त्याच्या काकांचे योगदान सर्वात मोठे आहे. लहान वयात कामाला लागून आपल्या पुतण्याला मोठ्या मंचावर खेळताना पाहण्याचे काकांचे स्वप्न अखेर अनिकेतने सत्यात उतरवले आहे. त्याची ही धडाकेबाज खेळी आगामी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
Comments are closed.