1983 ची ‘ती’ आठवण मी कधीच विसरू शकत नाही, ESA सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर झाला भावूक
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सचा ‘एज्युकेशन अँड स्पोर्टस फॉर ऑल’ (ईएसए) सामना वानखेडे मैदानावर रंगणार आहे. रविवारी दुपारी साडे तीन वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघातील सामन्याला 20 हजारांहून अधिक लहान मुलं उपस्थित असणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर भावूक झाला आणि त्याने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
वानखेडेवरील ईएसए सामना आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. स्टेडियममध्ये तब्बल 20 हजारांहून अधिक मुले फक्त तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. तुम्हाला चिअर करत आहेत. असा अनुभव खेळाडूंना रोज मिळत नाही. ती ऊर्जा खरोखरच अद्वितीय असते, असे सचिन तेंडुलकर म्हणाला.
मला आजही आठवतोय तो लख्ख आठवतो. 1983 ला मी एक लहान मुलगा म्हणून वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा सामना पाहायला गेलो होतो. त्या सामन्याच्या आठवणी माझ्या मनात आयुष्यभरासाठी कोरल्या गेल्या. मला पूर्ण विश्वास आहे की उद्या वानखेडेवर येणारी ही मुलेही आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी घेऊन घरी परततील, असेही सचिन तेंडुलकर म्हणाला.
नीता अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या उपक्रमाचे सचिनने मनापासून कौतुक केले. यंदाच्या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पहिल्यांदाच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड मधील 100 दृष्टिहीन मुले त्यांच्या हियरिंग बडीजसोबत सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, ग्रामीण आणि वंचित भागातील 200 हून अधिक विशेष गरजा असणारी मुलेही या सोहळ्याचा भाग असतील. महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांतून मुलांना आणण्यासाठी 500 हून अधिक बेस्ट आणि खासगी बसेस सज्ज आहेत. तसेच वैद्यकीय पथके, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या चोख बंदोबस्तासह 2 हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. मुलांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.